रायगड : गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उसर ते पोयनाड या दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. अलिबाग जवळच उसर येथे केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया (गेल) कंपनीचा आशियातील सर्वात मोठा पॉलिमर प्रकल्प उभारण्यात येत असल्याने, त्याच्या पायाभूत सुविधेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. या मार्गामुळे उसर ते पोयनाड हे 30 किलोमीटरचे अंतर अवघ्या 12 ते 15 किलोमीटरवर येणार असून, प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून केवळ 10 ते 15 मिनिटांवर येणार आहे.
भूसंपादन आणि वनविभागाच्या परवानगीसाठी साडेसात कोटींचा निधी
बैलखिंड मार्गे प्रस्तावित असलेला हा रस्ता लालफितीत अडकला होता. मात्र, आता या परिसराचे औद्योगिक दृष्ट्या महत्त्व वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रकल्प प्राधान्याने हाती घेतला आहे. भूसंपादन आणि वनविभागाच्या परवानगीसाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वनविभागाच्या अंतिम मान्यतेनंतर पूढील कामाला सुरुवात होईल, अशी माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता साईश कांबळे यांनी दिली आहे.
पर्यटनालाही मिळणार चालना
उसर येथे 8,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून गेल इंडीयाचा पॉलिमर प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पातून वार्षिक 1,000 मेट्रिक टन पॉलिमरचे उत्पादन होणार आहे. दरम्यान याच परिसरात 500 खाटांचे शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. यामुळे भविष्यात वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेता हा पर्यायी मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
वडखळकडून नागाव, चौल आणि अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांनाही हा मार्ग सोयीचा ठरणार असून, इंधन आणि वेळेची देखील बचत होणार आहे. सद्यस्थितीत वाहनांना उसर येथून अलिबाग, कार्लेखिंड आणि पेझारी मार्गे पोयनाडला जावे लागते. या नवीन मार्गामुळे हा मोठा वळसा वाचणार असून बैलखिंड मार्गे जाणाऱ्या या नव्या रस्त्यामुळे या परिसराच्या विकासाला देखील गती मिळू शकणार आहे.
अलिबाग-उसर मार्गावरील पूल पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला निर्णय़
पावसाच्या अखेरच्या टप्प्यात अलिबाग उसर मार्गावरील एक छोटा पूल पडल्ाने हा मार्ग वाहतूकीकरिता बंद झाला होता. परिणामी गेल कंपनीची अत्यंत अत्याधुनीक परदेशी मशीनरी घेवून येणारी अवजड वाहने सुमारे महिनाभर रस्त्यावरच अडकून पडली होती. त्यावेळी सार्वजनीक बांधकाम विभागाने गेल्या 20 वर्षांपूर्वी प्रस्तावीत केलेल्या बैलखिंड मार्गे उसर-पोयनाड या रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि अखेर सार्वजनीक बांधकाम विभागाने हा रस्ता करण्याचे नियोजन करुन कामास प्रारंभ केला आहे.