उरण : उरण तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस सारख्या साधीच्या आजारांनी थैमान घातले आहे. तालुक्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेणारे काही रुग्ण या आजारांमुळे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. असे असतानाही रायगड जिल्हा प्रशासन आणि उरण तालुका आरोग्य विभाग मात्र गाफील व अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासकीय अनास्थेमुळे ही परिस्थिती अशीच राहिली, तर तालुक्यातील घरोघरी मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रांत स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यातच सध्या पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. परिणामी ठिकठिकाणी साचलेली पाण्याचे डबके आणि घरांच्या आवारातील टाकाऊ साहित्यामध्ये जमा झालेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय प्रशासकीय दुर्लक्षामुळे तालुक्यातील विविध गोदामांचे, टायर दुरुस्तीची दुकाने आणि भंगाऱ्याची दुकाने ही डासांची मुख्य उत्पत्ती स्थाने (हॉटस्पॉट) बनली आहेत.
दूषित पाणी, वाढती अस्वच्छता, बदलते वातावरण आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. खासगी व सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत असून, तपासणीदरम्यान अनेक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा व तालुका आरोग्य विभागाच्या ढिसाळ आणि दुर्लक्ष कारभारामुळे तालुक्यातील चिरनेर, चाणजे, जासई, कोप्रोली, कळंबुसरे, विंधणे, करळ, सोणारी, चिलें, आवरे, वशेणी, बांधपाडा, पिरकोण, सारडे, नवघर आणि वेष्टी यांसारह अनेक गावांमध्ये साधीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव आणि अपुऱ्या माहितीमुळे लेप्टोस्पायरोसिस व डेंग्यूसारख्या गंभीर आजारामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत.तालुक्यात मलेरिया आणि डेंग्यूचा आलेख वेगाने उंचावत असताना आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे.