राजकुमार भगत
उरण: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहिमेतून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आली आहे.
मतदारसंघातील तब्बल ८५ हजार १२८ मतदारांची ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (फॉर्म अनकलेक्टेबल) या प्रवर्गात नोंद झाली आहे. मतदारसंघातील एकूण ३ लाख ५७ हजार २५५ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २३.३३ टक्के इतके मोठे असून, यामुळे स्थानिक प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांची अचूकता तपासण्यासाठी आणि दुबार, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी एसआयआर मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व ३५५ मतदान केंद्रांवर बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन गणना प्रपत्रे भरून घेण्याचे काम करण्यात आले.
या घरभेटींनंतर प्रशासनाला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, मतदारसंघातील ३ लाख ५७ हजार २५५ मतदारांपैकी केवळ २ लाख ७२ हजार १२१ मतदारांचेच गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त होऊ शकले आहेत.
मात्र, उर्वरित ८५ हजार १२८ मतदारांचे फॉर्म प्राप्त होऊ शकलेले नाहीत. बीएलओंच्या प्रत्यक्ष पाहणीत हे ८५ हजारांहून अधिक मतदार घरभेटीच्या वेळी गैरहजर असणे, कायमस्वरूपी अन्यत्र स्थलांतरित झालेले असणे, मृत व्यक्ती किंवा अन्य ठिकाणी नोंदणी असलेले दुबार मतदार असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय भाषेत या मतदारांचा समावेश 'गैरहजर, स्थलांतरित आणि मृत' (एएसडी) या प्रवर्गात करण्यात आला आहे.
या मोहिमेच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती देताना उरणचे निवडणूक नायब तहसीलदार प्रभाकर नवाळे यांनी सांगितले की, बीएलओंच्या घरभेटींचा अहवाल आणि उपलब्ध डेटाच्या आधारे एसआयआर पूर्ण झालेल्या मतदारांची प्राथमिक यादी २४ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
या प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीवर ज्या नागरिकांना काही आक्षेप, हरकती किंवा दावे दाखल करायचे असतील, त्यांच्यासाठी २३ सप्टेंबरपासून प्रक्रिया खुली केली जाईल. २३ सप्टेंबरपासून प्राप्त होणाऱ्या सर्व दावे व हरकतींची रीतसर छाननी करून आणि सुनावणी पूर्ण करून २७ ऑक्टोबर रोजी उरण मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
मतदारांचे स्थलांतर झाले असण्याची शक्यता
उरण तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वेगाने होत असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर झाले असण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्राथमिक यादीकडे आणि त्यानंतर दाखल होणाऱ्या हरकतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.