Uran Oil Tanker Accident Pudhari
रायगड

Uran Oil Tanker Accident: जेएनपीए पोर्ट रोडवर प्रशासनाचा निष्काळजीपणा; ऑईल टँकर पलटी, हजारो लिटर तेलाची नासाडी

मृत्यूच्या सापळ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल ममताबादे

जेएनपीए: उरण तालुक्यात जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. पियूपी बिल्डिंग परिसरात आज सकाळी 10:40 वाजता तेलाने भरलेला एक ऑईल टँकर अचानक पलटी झाल्याने हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडले.

या अपघातामुळे पोर्टची वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर रस्ता निसरडा होऊन दुसऱ्या मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.

उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आज सकाळी तेलाने भरलेला टँकर पलटी झाला. घटनास्थळाजवळच इंडियन कस्टमचे कार्यालय असल्याने आणि हा मार्ग पोर्टसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडल्याने रस्ता पूर्णपणे निसरडा झाला आणि आणखी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रित केली, मात्र तोपर्यंत मोठे आर्थिक व पर्यावरणीय नुकसान झाले होते.

स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित विभागांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेएनपीटी पोर्ट रोडवर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. अवजड वाहनांची बेसुमार वर्दळ, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी आणि वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप नागरिकांनी केला.

प्रत्येक वेळी अपघात झाल्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हजारो लिटर तेल वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून तेल रस्त्यावर व गटारात मिसळल्याने पर्यावरणीय धोकाही निर्माण झाला आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज

तेलामुळे रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. नागरिकांनी या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. अवजड वाहनांवर कडक नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, वेगमर्यादा पाळण्यास भाग पाडणे आणि अपघातप्रवण ठिकाणांची तपासणी करून गतिरोधक, सूचना फलक यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

केवळ अपघात झाल्यावर घटनास्थळी धाव घेणारे प्रशासन अपघात रोखण्यासाठी ठोस पावले कधी उचलणार, असा प्रश्न आता उरणकर विचारत आहेत. संबंधित विभागांनी वेळीच दखल न घेतल्यास यापेक्षाही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT