उरण: राजकुमार भगत
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून जागतीक वारसास्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यांतील घारापुरी बेटावरील भूतकाळाचा वेध घेण्याकरिता आगामी सुमारे दोन वर्ष कालावधीची उत्खनन मोहिम हाती घेण्यात आली आहे. या उत्खनन मोहिमा सोमवारी विधीवत पूजन करुन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिक्षक डॉ.अभिजित आंबेकर, उप अधिक्षक एन.एस.नागानुर, सहाय्यक आर्कोलॉजिस्ट आर.बी.रविराज, पुरातत्व विभागाचे घारापूरी येथील प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरी ग्रामपंचायतिचे उप सरपंच बळीराम ठाकूर आणि भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घारापुरी बेटावर गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले असता त्यांना मोरा बंदर आणि शेत बंदर या दरम्यानच्या परिसरात काही पुरातन भांडी आढळली होती. त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्ती होती अशी शक्यता पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तविली होती. त्याचप्रमाणे या परिसरात आणखी लेणी आणि मुर्त्या सापडण्याची शक्यता देखील आहे.
सोमवारपासून सुरु करण्यात आलेल्या या उत्खननामुळे तत्कालिन संस्कृतीचा, समाजाचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. घारापूरी बेटावरील सुमारे एक किलोमिटर परिसरात हे उत्खनन होणार असून यासाठी 60 ते 70 स्वयंसेवक, कामगार काम करणार आहेत. सुमारे दोन वर्षे ही उत्खनन मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
इसवीसनाच्या 9 व्या ते 13 व्या शतकातील लेणी
घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी या महाराष्ट्रामधील मुंबई शहराच्या पूर्वेस सुमारे 10 किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यांतील समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या या लेणी इसवीसनाच्या 9 व्या ते 13 व्या शतकाच्या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत.
युनेस्कोकडून 1987 मध्ये घारापूरी जागतिक वारसास्थळ घोषीत
1987 साली या घारापूरी लेण्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केल्या आहेत. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे.
घारापूरीचे प्राचीन नाव श्रीपुरी
एका अखंड पाषाणात या लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूस सुद्धा नव्हता त्यामुळे भारतीय आपल्या पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या होत्या. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी असे मानले जाते. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मोगल यांनी तिथे क्रमाक्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.
शैव संप्रदायातील शिल्पकाम
घारापूरी बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायातील आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध आदि लेणी अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात साकार करतात. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या या उत्खननामुळे येथे कोणते नवे पुरावे, कलाकृती सापडतात याची उत्सूकता आत्ता नागरिकांना लागली आहे.
उत्खननातून काय साध्य होणार ?
घारापुरी (एलिफंटा) बेटावर सापडलेल्या प्राचीन अवशेषांवर अधिक संशोधन करण्यासाठी आणि बेटाच्या समृद्ध भूतकाळाची माहिती मिळवण्यासाठी हे उत्खनन होत आहे.
उत्खननामुळे बेटावरील पुरलेल्या स्तूपांचा शोध घेतला जाईल आणि बेटाच्या इतिहासावर अधिक प्रकाश टाकता येईल.
घारापूरी बेटाच्या प्राचीन व्यवसायाचे आणखी पुरावे मिळेल.
उत्खननातून बेटाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूतकाळाविषयी नवीन माहिती मिळणे शक्य होईल.