रायगड : रायगड जिल्ह्यात काही भागात मंगळवारी (दि.1) रोजी अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाने आंबा-काजू बागायती आणि मच्छी व्यवसायला मोठा फटका बसणार आहे. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकावर किड व रोग प्रादुर्भावाची शक्यता कृषी अधिकार्यांनी वर्तविली आहे. तर मच्छी सुकविण्यास अडचणी येत असल्याने अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमारांचे कोटयवधींचे नुकसान होणार असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.
राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी (31मार्च) रायगड जिल्हयात ढगाळ वातावरण होते. तर मंगळवारी पहाटे रायगड जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. विशेष करून अलिबाग तालुक्यात अर्धातास जोरदार पाऊस झाला आहे. मुरुड तालुक्यात तुरळक पाऊस झाला. तर उर्वरित तालुक्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. आगामी तीन दिवस जिल्हयासाठी हवामान विभागाने पावसाचा पिवळा बावटा जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्हयात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी व्यावसायिकांसह अनेकांवर परिणाम होणार आहे. सर्वाधिक फटका मच्छीमारी व्यवसायाला बसणार आहे.
अलिबाग तालुक्यातील नवगाव, वरसोली, चाळमळा, अलिबाग, थेरोंडे, आग्राव, रेवदंडा, मुरुड तालुक्यातील कोर्लई, बोर्लई, एकदरा, राजपुरी, श्रीवर्धनमधील दिघी या बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असते. उन्हाळ्यामध्ये मच्छीचे प्रमाण कमी असले तरी मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करत असतात. हे यात जवळा ही मच्छी मोठ्या प्रमाणात आणली जाते. कारण जवळा ही मच्छी सुकवून त्याची सुकट केली जाते. या सुकट मच्छीला खूप मागणी असते. समुद्रात पकडून आणलेली मच्छी त्याच दिवशी सुकवून विक्रीसाठी तयार केली जाते. त्याचबरोबर बोंबील, आंबाड, वाकटीसह इतरही मच्छी सुकविली जाते. प्रत्येक बंदरात सुमारे 40 ते 50 लाखांची सुकी मच्छी दररोज तयार होत असते. मात्र सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि.1) पहाटे अलिबाग तालुक्यात सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे मच्छिमारांची सुकत टाकलेली मच्छी भिजली गेली. मच्छी सुकविण्याची खळी ओली झाली आहेत.
त्यामुळे मच्छीमारांना आणलेली मच्छी सुकविताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. आगामी दोन-तीन दिवस हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जाहीर केल्याने पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांवर किड व रोग प्रादुर्भावाची शक्यता आहे. आंबा पिकावर फुलकिडी व फळमाशी या किडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव तसेच काजू पिकावर काजूवरील ढेकण्या आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
रायगडच्या किनारपट्टीवर दहा ते बारा मच्छीमारी बंदरे आहेत. या बंदरांवर दररोज सुमारे 40 ते 50 लाखांच्या मच्छीची उलाढाल होत असते. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण आहे. आणलेली मच्छी योग्य प्रकारे सुकविली गेली नाही तर मच्छीमारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच सुकी मच्छी भिजल्यास दर्जावर परिणाम होईल. त्यामुुळे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे होणार्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे.प्रवीण तांडेल, सचिव, रायगड जिल्हा कोळी समाज संघ