Kurdus village in Alibaug Dahi Handi above the well
जयंत धुळप
रायगड: गोकुळाष्टमीच्या दिवशी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याची परंपरा सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डूस या छोट्याशा गावात गेल्या ३३ वर्षांपासून एक अनोखी दहीहंडी रंगते—तीही गावातील विहिरीवर! या दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी आता केवळ रायगडच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील गोविंदा पथके कुर्डूसमध्ये गर्दी करतात.
१९९२ साली कुर्डूस गावातील देऊळआळी परिसरातील पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे आणि केणी या कुटुंबातील धाडसी तरुणांनी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने विहिरीवर दहीहंडी फोडण्याची परंपरा सुरू केली. सुरुवातीला सिताफळीच्या झाडाचा आधार घेत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न झाला, पण नंतर विहिरीच्या कठड्यावर थर रचून त्यावरून उडी मारून दहीहंडीला स्पर्श करण्याची पद्धत रूढ झाली.
या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे, गोविंदाने दहीहंडीला हात लावला की ती फुटली असे मानले जाते. नंतर ती हंडी खाली उतरवून विहिरीत फोडली जाते. गोविंद पथकातील सर्व सदस्य विहिरीत उडी मारून आनंद व्यक्त करतात. विशेष म्हणजे, या थरारात आजवर कोणालाही दुखापत झाल्याची नोंद नाही.
मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांतील गोविंद पथकेही या अनोख्या दहीहंडीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी कुर्डूस गावात येतात. गेल्या वर्षी आकाश पिंगळे या युवकाने सलग पाचव्यांदा दहीहंडी फोडून विक्रम प्रस्थापित केला.
यंदा १६ ऑगस्ट रोजी, गावातील पूजा आणि पालखी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता विहिरीवरची दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरुणांमध्ये प्रचंड उत्साह असून, जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती आयोजक पराग पिंगळे यांनी दिली.
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी ही केवळ एक उत्सव नाही, तर धाडस, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनली आहे. राज्यभरातील गोविंदांना वेगळ्या अनुभवाची ओढ लागलेली असून, या अनोख्या दहीहंडीचा थरार दरवर्षी वाढतच आहे.