उरण ः उलवे नोड येथे पक्षी विकणार्या देवेंद्र लालचंद पाटील (रा. कोपरखैरणे) याला उरण वनविभागाने अटक केली असून त्याच्याकडून दुर्मिळ 42 मुनिया पक्षी जप्त केले आहेत. त्याला पनवेल न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी नंतर हे पक्षी जंगलात सोडून दिले.
वन विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरीक्षेत्र अधिकारी उरण, वनपाल दापोली व वनपाल जासई सह वनरक्षक स्टाफ व प्राणीमित्र तथा पक्षीमित्र यांच्यासह ही कारवाई केली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी हे पक्षी पिंजर्यात घेवून विकण्यासाठी आला होता. यावेळी धाड टाकली असता, रेड मुनिया, स्कॅली मुनिया आणि ट्रायकलर मुनिया जातीचे 42 पक्षी होते. ते वनविभागाने ताब्यात घेतले. तपासात हरेश दामोदर पाटील (रा. पेण ) हाही सहभागी होता.
दोघांना ताब्यात घेवून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 चे कलम 9, 39, 48 (अ), 51 अन्वये वन गुन्हा नोंद केला आहे. प्रथमवर्ग न्यायालय पनवेल येथे हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली.
ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी उरण नथुराम कोकरे, वनपाल दापोली संजय पाटील व वनपाल जासई नारायण माने सह वनरक्षक पांडुळे, खताळे, झेंडे, कार्ले, पाटील व रेंज स्टाफ यांनी केली. वनविभागामार्फत पुढील तपास सुरु आहे.