श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन शहरात परवाना नसताना अल्पवयीनाने भरधाव वाहन चालवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 17 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीवर्धन शहरातील र. ना. राऊत हायस्कूल परिसरात, गणेश वाणी यांच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयासमोर घडली. या अपघातात परवेज शफी हामदुले (वय 53, रा. मोगल मोहल्ला, श्रीवर्धन) हे गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हे आपली स्कुटर घेऊन मेन बीचकडून येत असताना, समोरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या थार वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. सदर थार वाहन अल्पवयीन विधीसंघर्षित बालक चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता.
अपघातात मयताच्या डोक्याला तसेच उजव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी रुची रोशन बोरकर (वय 39, रा. पेशवे आळी, श्रीवर्धन) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 105 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम अंतर्गत त्याला ताब्यात घेऊन कर्जत येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले असून, संबंधित बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर श्रीवर्धन शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता म्हसळा, दिघीसागरी, माणगाव आदी पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आज शिवाजी चौक, बाजारपेठ व प्रमुख नाक्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील काही दिवसांतील दुसरी गंभीर अपघाताची घटना असून, यापूर्वी हरिहरेश्वर येथेही अशाच स्वरूपाचा अपघात घडला होता. त्यामुळे अल्पवयीन वाहनचालक, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी व वाहतूक नियमांची अंमलबजावणी याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परवाना नसताना वाहन देणाऱ्या पालकांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.