पाणीयोजनेसाठी आदिवासींचे अलिबागमध्ये बेमुदत उपोषण pudhari photo
रायगड

Tribal community hunger strike : पाणीयोजनेसाठी आदिवासींचे अलिबागमध्ये बेमुदत उपोषण

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी,मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि घेरावाडी या आदिवासी वाडीवरील ग्रामस्थ आपल्या मुलाबाळांसह गुरुवापासून रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. 40 घरांच्या या वस्तीसाठी जलजीवन मिशन योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झाले परंतु अद्यापही या योजनेचे काम अपूर्ण आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे.

ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पनवेलच्या आपटा परीसरातील दुर्गम डोंगराळ भागातील या आदिवासी वाडीला दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावावी यासाठी शासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

निवेदने, मोर्चे आंदोलने अगदी उपोषणापर्यंत आंदोलन केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी जलजीवन मि शन योजनेतून गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजुर झाली. या कामाचे कार्यादेश पारीत होवून कामाला सुरूवात देखील झाली. परंतु आज तीन वर्षे झाली तरी हे काम अपूर्ण आहे.

यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारयांकडे पाठपुरावा करण्यात आला . परंतु अद्यापही ग्रामस्थांना या योजनेचे पाणी मिळू शकले नाही. ग्रामस्थांच्या आग्रहानंतर या कामाचा पंचनामादेखील झाला. स्थळपाहणी अहवालानुसार या योजनेची जलवाहिनी गावापर्यंत पोहोचली आहे. मग गावाला पाणी मिळण्यात काय अडचण आहे, असा सवाल या आदिवासी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

सध्या फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी डोंगरदरयातून भटकायला लावणारे पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी यांच्यावर ग्रामस्थांनी दिरंगाईचा ठपका ठेवला आहे.

पाणी योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत परंतु कुणीच अधिकारी दाद देईना. अखेर मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. आता मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
संतोष ठाकूर,अध्यक्ष ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT