रायगड

रायगड जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार

दिनेश चोरगे

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत १८ लाख ६४ हजार २५२ बांबू व शेवगा जातीची रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.

वृक्षलागवड मोहिम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, नदी किनाऱ्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. तसेच शेवग्याची रोपे नागरिकांनी आपल्या आवारात लावावीत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे लावण्याचेउद्दिष्ट देण्यात आले आहे.

वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करुन जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्याचा सत्कार करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेण्यात यावा, तसेच वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्यात यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खड्डे खोदणे, सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून मागणीप्रमाणे रोपे उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करावी, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दत्तक रोपे वृक्षलागवड यादी, फोटोसह सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT