चौक-कर्जत फाट्यावर वाहतूककोंडी; उपाययोजनांची गरज pudhari photo
रायगड

Raigad News : चौक-कर्जत फाट्यावर वाहतूककोंडी; उपाययोजनांची गरज

दर शनिवारी लागणार्‍या लांबच लांब रांगांमुळे वाहनचालक, पर्यटक हैराण

पुढारी वृत्तसेवा

कोप्रोली : पंकज ठाकूर

चौक-कर्जत या नाक्याला दर शनिवार-रविवारी गाड्यांची जत्राच भरली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. यावर उपाय तो कायमचा शोधणे गरजेचे झाले आहे. चौक-कर्जत नाका हा मुंबई-पुणे महामार्गामुळे नेहमीच वर्दळीचा बनला आहे; त्यामुळे या भागात हजारो वाहने या मार्गावरून वाहतूक करत असतात.

अनेक वर्षापूर्वी याचमार्गावर अनेकदा खोपोलीकडे जाणार्‍या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. या कारणांमुळे मुंबईच्या बाजूने पुणे गाठण्यासाठी दिवस लागत होता. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाकडून द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे जूना मुंबई-पुणे मार्गावर कधीच वाहनांच्या रांगा पहायला मिळत नव्हत्या, परंतु या काही दिवसांपासून चौक- कर्जत या नाक्याला परत एकदा वाहनाच्या रांगांनी घेरल्याचे दिसून येते.

सध्या पावसाचे दिवस असून कर्जत सारख्या निसर्ग रम्य ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक कर्जतला ये-जा करत असतात. यासाठी मुंबईहून हजारो गाड्या कर्जतकडे रवाना होत असतात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या या गाड्यांमुळे सदर नाक्यावर परत एकदा वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, त्यामुळे येथील स्थानिक सामान्य जनतेला या मार्गावरून मार्गस्थ होताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करणे गरजेचे होऊन बसले आहे. याची नेमकी कारणे शोधून वाहतूकीस अडथळा ठरणारी कारणे दूर करणे गरजेचे होऊन बसले आहे.

वाहतुकीस अडथळा ठरणारी कारणे

येथे येणारी हजारो वाहने मुंबईच्या दिशेने सकाळी लवकर निघत असतात; त्यामुळे गाडीतील लहान मुले, अबाल वृध्द सकाळी काही न खाता येत असतात. यामुळे चौक कर्जत येथील नाक्यावर आल्यावर अल्पोपहार करण्यासाठी उतरत असून. हजारो गाड्या अरूंद असलेल्या कर्जत मार्गावर थांबवल्या जात असतात. त्यामुळे येथे दर शनिवार - रविवारी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत असतात आणि याला कारण एकच नियम बाह्य उभ्या केलेल्या गाड्या त्यामुळे येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण करत असतात.

वाहतूककोंडीवर कायम स्वरूपी उपाययोजना हव्यात

म्हणून येथे असणार्‍या सर्व अल्पोपहार दूकांनदारांना समज देऊन आपापल्या दूकानांजवळील जागा रिकाम्या ठेवल्या पाहिजेत (समोरील जागेवर जास्तीचं सामान ठेऊ दिले नाही पाहिजेत) तसेच उभ्या राहणार्‍या गाड्यांना व्यवस्थित उभ्या करायला सांगण्यात यायला हव्यात. तसेच नाक्यावरच ज्या गड्या उभ्या करण्यात येत असतात; त्या गाड्यांना तेथे उभ्या न करता थोड्या अंतरावर ( नाक्यापासून थोड्या पूढे) उभ्या करायला लावल्या पाहिजेत. तर यावर असे उपाय योजून वाहतूककोंडी थोपवली जाऊ शकते. अशा उपाय योजनांमुळेच चौक कर्जत नाका वाहतूक कोंडी मुक्त झालेला दिसून येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT