महेंद्र खैरे
रेवदंडा: कोकणात पावसाळ्याचे आगमन होताच अलिबाग, रेवदंडा, नागाव, काशिद आणि मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हजारो पर्यटक आणि चाकरमानींनी गजबजलेल्या या पर्यटनस्थळांवर सध्या शांतता पसरली असून पर्यटनावर आधारित व्यवसायांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
विशेषतः रेवदंडा समुद्रकिनारा, नागाव, काशिद आणि मुरूड येथील बीच परिसरात पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.
सुट्ट्या संपल्याने चाकरमानी आपापल्या नोकरीच्या ठिकाणी परतले असून पावसाळी वातावरणामुळे पर्यटकांचाही ओघ कमी झाला आहे. मे महिन्यात हाऊसफुल्ल असलेली हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे तसेच समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, जलक्रीडा व्यावसायिक, घोडागाडी चालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावला आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने जलक्रीडा उपक्रम बंद ठेवावे लागतात. तसेच सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे स्थानिक अर्थचक्रावर काही प्रमाणात परिणाम जाणवत आहे. रेवदंडा बीचसह अन्य समुद्रकिनाऱ्यांवर दिवसभर तुरळक पर्यटक दिसून येत असून नेहमीची गजबज पूर्णपणे ओसरली आहे.
गणेशोत्सवापर्यंत पर्यटक कमीच
स्थानिक व्यावसायिकांच्या मते, गणेशोत्सवापर्यंत पर्यटन व्यवसायात विशेष वाढ होण्याची शक्यता कमी असून पावसाळी पर्यटनावरच काही प्रमाणात व्यवसाय अवलंबून राहणार आहे. मात्र हिरवाईने नटलेला कोकण अनुभवण्यासाठी काही पर्यटक अजूनही भेट देत असल्याने व्यवसायाला थोडाफार आधार मिळत आहे.
सुरक्षा उपाययोजना वाढल्या
समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा उपाययोजना वाढविण्यात आल्या असून प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.