रायगड

कासव संवर्धनाला पर्यटनाची साद

अनुराधा कोरवी

मंडणगड : विनोद पवार :  समुद्री कासवांच्या संवर्धनाकरिता वेळास येथे दीड दशकांपूर्वी सुरू झालेली अत्यंत दुर्मिळ ऑलीव्ह रिडले सागरी कासव संवर्धन मोहीम, तालुक्याच्या बहुआयामी विकासाचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या टप्यावर आली आहे. या अनुषंगाने निर्माण होऊ पाहत असलेल्या पर्यटन संधींचा स्थानिकांसह तालुक्याने लाभ घेण्याची आवश्यकता आहे, याकरिता स्थानिक पातळीवरून सुरु असलेल्या प्रयत्नांना शासनाने पाठबळ देण्याची गरज आहे.

पर्यावरण संरक्षण हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे. यातूनच 2006 साली तालुक्यातील जैवविवीधतेने नटलेल्या वेळास या गावी कासव संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांमध्ये पुरेशी जागृती झाल्यावर ग्रामपंचायतीने वनविभाग व संबंधीत यंत्रणेच्या सहकार्याने या मोहिमेचे संचालन सुरू केले. त्यातून हजारो समुद्री कासवे दरवर्षी आपला जन्मसोहळा साजरा करत समुद्रात विसावू लागली.

गतवर्षी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या कासवांच्या समुद्री प्रवासाचे टँगींग करण्याचे मानवी प्रयत्नही सुरू झालेले आहेत. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम कासव संवर्धन मोहिमेवर झालेला नसला तरी हा हंगाम यावर्षी काहीसा लांबला आहे.

वेळास या गावास कासव संवर्धन मोहीम, जैवविविधतने नटलेले गाव यासह अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेले आहेत. त्यामुळे वेळास या गावाची पर्यटनदृष्ट्या प्रगती ही अनेक अर्थाने तालुक्याचे विकासाचे मापन करणारी ठरते. स्थानिक पातळीवर कासव मोहमेचे संचालन सुरु झाल्यावर येथे येणारे पर्यटक व अभ्यासकांना विविध सेवा देण्याच्या स्थानिक पातळीवरून प्रयत्न होत आहे. यातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

जागतिक दर्जाचे कासव संग्रहालय

ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मिळ समजली जाणारी प्रजाती असल्याने पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी येथे कासव संग्रहालयाचा जागतिक दर्जा असणारा प्रकल्प प्रस्तावीत केला आहे. त्यांचा प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून याकरिता ग्रामपंचायतीने जागाही उपलब्ध करुन दिली आहे. शासकीय पातळीवर प्रकल्पाचे सादरीकरणही संबंधितांनी केले आहे.

गतवर्षी दहा हजाराहून अधिक पर्यटकांनी कासव महोत्सवास भेट दिली आहे. राज्य शासन व शासनाच्या सहयोगी संस्थांनी या मोहिमेस जास्तीत- जास्त पाठबळ दिल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक पातळीवर रोजगार वाढेल. यावर्षी 26 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यांचा जन्मसोहळा लवकरच घोषित करण्यात येईल.
– मोहन उपाध्ये, ( सहाय्यक संशोधक कांदळवन
प्रतिष्ठान, रत्नागिरी, रायगड )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT