माथेरानः माथेरान येथील शार्लेट लेक येथे रविवारी ( 15 जून) सायंकाळी तीन तरुण बुडाल्याची घटना घडली. एकाचा पाय घसरून तो पाण्यामध्ये पडला त्याला काढण्यासाठी आणखी दोघेजण गेले तर असे एकूण तिघेजण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे, फिरोज शेख असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील आहेत.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नवी मुंबईतील कोपरणखैरणे परिसरातील दहा तरुणांचा एक ग्रुप माथेरान फिरण्यासाठी म्हणून आला होता. हे तरुण माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या पिसरनाथ मंदिर येथील दर्शन घेऊन जवळील परिसरातील शार्लेट लेक तलावाच्या किनारी मौजमजा करीत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास यातील एक तरुण पाण्यात उतरला. मात्र तो पाय घसरून उलटा पडला असता त्याला काढण्यासाठी म्हणून बाकी सर्व तरुणांनी पाण्यात उडी घेतली. मात्र यावेळी पडलेल्या तरुणांचा दोन साथीदार तरुणांनी हात पकडला मात्र तेही त्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे, फिरोज शेख हे तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. सोबत आलेल्या तरुणांनी यावेळी ही घटना स्थानिकांना कळवली. घटनास्थळी माथेरान पोलिस हजर होत शोधकार्य सुरु केले. मदतीसाठी सह्याद्री आपतकालीन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. खोपोली येथील अपघात ग्रस्त सामाजिक संस्था गुरुनाथ साठलेकर यांच्या टीमला देखील यावेळी माथेरान पोलिसांनी मदतीसाठी पाचारण केले.या घटनेची नोंद माथेरान पोलिसा करण्यात आली आहे.
माथेरानमधील घटना सायंकाळी चार वाजता घडली आहे. एकूण दहाजण आले होते. त्यातील तिघेजण तलावात बुडाले. संध्याकाळपासून शोधकार्य सुरु करण्यात आले होते. पण अंधारामुळे तसेच पडत असलेल्या पावसामुळे हे शोधकार्य थांबविण्यात आलेले आहे. सकाळी पुन्हा ते सुरु केले जाईल,अशी माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी पुढारीशी बोलताना दिली.