नाते (रायगड) : इलियास ढोकले
किल्ले रायगडावर प्रतिवर्षी होणार्या विविध कार्यक्रमांसाठी येणार्या अतिविशिष्ट मान्यवरांच्या सोयीसाठी व येणार्या हजारो शिवभक्तांकरिता शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात असतानाच रायगडाच्या पायथ्याशी असणार्या पाचाडकरांची तहान मात्र गेल्या दोन दशकांपासून कायम राहिली असल्याचे दुर्दैवी वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे .
दरम्यान मागील दोन दशकांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जाणार्या पाचाडकरांच्या पाण्याची समस्या जलजीवन योजनेद्वारे निकाली निघेल या विश्वासालाही मागील दोन वर्षापासून काम वनखात्याच्या नियमांमुळे रखडल्याची माहिती चौकशी दरम्यान प्राप्त झाली आहे.
पाचाड परिसरातील विविध नागरिकांशी तसेच सरपंच सीमा महेश बेंदुगडे यांच्याकडे या संदर्भात विचारण्या केल्यानंतर त्यांनी पाचाड परिसरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन पंचायत समितीकडे विहित स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा अर्ज दिल्याची माहिती दिली.
पाचाड ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणार्या पाचाड नाका, बौद्धवाडी, गावठाण बाऊलवाडी व मोहल्ला या ठिकाणी असणार्या विहिरींमधील पाण्याचा साठा जवळपास संपुष्टात आल्याने आता टँकरद्वारे या विहिरींमधून पाणी भरले जाणार असल्याची माहिती सरपंच सीमा बेंदुगडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे.
जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भातही होणार्या विलंब बाबत स्पष्टीकरण देताना सरपंच सीमा बिंदुगुडे यांनी सांगितले की, वनखात्याच्या जमिनीमधून पाईपलाईन नेणे आवश्यक असल्याने वन खात्याची परवानगी आवश्यक आहे मात्र या संदर्भात निर्माण झालेली तांत्रिक अडचणीने जलजीवन मिशनचे काम रखडल्याचे त्यांनी मान्य केले.
या संदर्भात वन खात्याशी संपर्क साधून जनतेची असलेली मूलभूत सुविधा समस्या लक्षात घेऊन त्यांनी आपल्या जमिनीतून जलजीवन मिशनच्या कामाला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले.
वनखात्याचे महाड अधिकारी साहू यांना विचारणा केली असता त्यांनी ग्रामपंचायतीचा लेखी प्रस्ताव आपल्या विभागाकडे प्राप्त झाल्यास आपण तातडीने यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक ते मार्गदर्शन घेऊ असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. किल्ले रायगडावर गेल्या दशकापासून शिवभक्तांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळते.
श्री शिवराज्याभिषेक तारीख व तिथीनुसार त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तसेच श्री शिव पुण्यतिथीनिमित्त होणार्या कार्यक्रमांशिवाय अन्य कार्यक्रमही गडावर मोठ्या संख्येने होऊ लागल्याने स्थानिक प्रशासनावर या ठिकाणी शिवभक्तांची सोय सुविधा तसेच मान्यवरांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
या सर्व बाबी विचारात घेता अत्यावश्यक असलेल्या बाबींची पूर्तता होणे गरजेचे असले तरीही गेल्या दोन दशकांपासून पाचाडकरांचा असलेला पाण्याचा प्रश्न मात्र आज पावतो निकाली निघाला नसल्याने पाचाडकर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकूणच किल्ले रायगडावर येणार्या लाखो शिवभक्तांसाठी शासन तत्परतेने कार्यरत होत असतानाच किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणार्या पाचाडकरांच्या समस्येबाबत मात्र तेवढीच तत्परता दाखवावी अशी अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार पाचाड हद्दीमध्ये मोहल्ला, नाका, बाऊलवाडी, गावठाण व बौद्ध वाडी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून विहिरी अस्तित्वात आहेत असे सांगण्यात आले. दरम्यान पाचाड आरोग्य केंद्रामध्ये देखील पाणीपुरवठा होत नसल्याने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.