महाड : एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने ती रस्त्यालगतच्या शेतामध्ये घसरून बांधावर आपटल्याने काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना शनिवारी महाड तालुक्यामध्ये घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाड आगारातील गोठवली बिरवाडी- महाड बस क्रमांक MH 20 BN 6799 ही बस शनिवार 2 नोव्हेंबर 2024 रोजी महाडच्या दिशेने येत होती. निगडे सावंतवाडी जवळ बस आली असता ब्रेक निकामी झाल्याने ही बस रस्त्याच्या डाव्या बाजू लगतच्या शेतामध्ये जाऊन बांधावर जोरात आपटली. बस आपटल्याने बसमधील काही प्रवाशांना छाती व कमरेला मार लागून किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचाराकरीता महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करीत होते. कोणासही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे एमआयडीसी पोलीस व एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.