नेवाळी : अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वरिष्ठ समितीकडून बैलगाडा शर्यतींच्या शिस्तीमध्ये आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेमध्ये अधिक काटेकोरपणा आणण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या नियमांनुसार बैलगाडा शर्यत सुरू होण्यापूर्वीपासून संपूर्ण शर्यतीदरम्यान कोणत्याही समर्थक किंवा गाडामालकाच्या हातात चाबूक, काठी किंवा अशाच प्रकारचे कोणत्याही वस्तू आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. नुकताच असा प्रकार ठाणे जिल्ह्यात बैलगाडा संघटनेच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने कठोर नियमावली जारी केली आहे.
बैलगाडा शर्यत राज्यात सुरू झाल्यापासून अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना नियमावली जाहीर करत आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी संघटना कंबर कसत आहे. आता संघटनेने स्पष्ट केले आहे की, शर्यतीतील बैलांवर कोणत्याही प्रकारे दबाव, जबरदस्ती किंवा त्रास देणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे जर शर्यतीच्या परिसरात अशा वस्तूंसह कोणतीही व्यक्ती आढळली तर त्याच्यावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच संबंधित बैल गाडा पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होण्यास बंदी राहणार आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हा नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून आगामी शर्यत हंगामात सर्व स्पर्धांमध्ये नियमांचे काटेकोर पालन होणार आहे.
आयोजक, गाडामालक आणि स्थानिक समित्यांना या नियमाबाबत अधिकृत सूचना पाठविण्यात आल्या आहेत. शर्यत आयोजकांनी सर्व प्रवेशद्वारांवर आणि इतर जागांवर तपासणी पथक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई करता येईल.
संघटनेने सर्व सहभागी आणि समर्थकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या नियमांचे पालन करून बैलगाडा शर्यतींची पारंपरिक ओळख राखावी आणि बैलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. नवीन नियम अवलंबल्याने शर्यती अधिक शिस्तबद्ध आणि प्राणिमैत्री होत असल्याचा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.