नेवाळी : शुभम साळुंके
पहिल्या दमदार पावसानंतर ठाणे जिल्ह्यात चिंबोऱ्या आणि मुठ्यांचा हंगाम रंगात आला असून रविवारी संडे स्पेशल मेजवानीसाठी शहरातील मत्स्यखवय्यांनी ग्रामीण भागाकडे धाव घेतली आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाकुर्ली, नेवाळी, मलंगगड परिसरासह ग्रामीण भागातील मासळी बाजार आणि हायवेलगतच्या ढाब्यांवर शनिवारी दिवसभर खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. वाढत्या मागणीमुळे बाजारात मुठे १०० रुपये डझन, तर चिंबोऱ्या तब्बल १,२०० रुपये डझन दराने विकल्या जात असूनही खरेदीचा उत्साह कमी झालेला दिसला नाही.
पावसाळ्याच्या सुरुवातीला शेताच्या बांधावर, ओढ्यांच्या काठावर आणि डोंगरमाळावरून बाहेर पडणाऱ्या मुठ्या आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी ग्रामीण भागात रात्री विशेष मोहीम राबविली जाते. हातात हिलाल (आगीचा गोळा) घेऊन बिळांजवळ जाऊन चपळाईने मुठे पकडले जातात. त्यानंतर त्यांची थेट बाजारपेठा, मासळी बाजार आणि हायवेवरील ढाब्यांकडे विक्रीसाठी रवानगी होते.
आगरी खाद्यसंस्कृतीत चिंबोऱ्या आणि मुठ्यांच्या झणझणीत रस्स्याला विशेष स्थान आहे. आगरी मसाल्यात तयार केलेला रस्सा आणि सोबतीला तांदळाची भाकरी ही पावसाळ्यातील अनेक कुटुंबांची आवडती मेजवानी मानली जाते. मासेमारीवर बंदीचा कालावधी सुरू असल्याने समुद्री मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे पावसाच्या पहिल्या सरींसह बाजारात दाखल होणाऱ्या चिंबोऱ्या आणि मुठ्यांकडे खवय्यांचा विशेष ओढा वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
श्री मलंगगड, नेवाळी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील ढाब्यांवर रविवारी विशेष मेनूची तयारी करण्यात आली आहे. पावसाळी पर्यटनासाठी मलंगगड परिसरात येणारे पर्यटक धबधब्यांचा आनंद घेतल्यानंतर गावठी पद्धतीने बनविलेल्या चिंबोऱ्या-मुठ्यांच्या रस्स्याचा आस्वाद घेण्यासाठी ढाब्यांवर आणि नेवाळी गावात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
मात्र, बदलते वातावरण, शेती क्षेत्र घटणे आणि नैसर्गिक अधिवासांवर वाढते अतिक्रमण यामुळे चिंबोऱ्या आणि मुठ्यांचे प्रमाण वर्षागणिक कमी होत असल्याची खंत जाणकार व्यक्त करत आहेत. तरीही पहिल्या पावसात या पारंपरिक खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी महागाईची पर्वा न करता खवय्ये बाजारात गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे.