खोपोली: प्रशांत गोपाळे
पावसाळ्यात झेनिथ, केपी वॉटर फॉल्ससह अन्य नैसर्गिक धबधब्यांवर मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांचा जीव वाचवि-ण्यासाठी झेनिथ ठाकूरवाडीमधील युवक देवदुतांची भूमिका निभावत आहेत. या देवदुतांना आता हेल्प फाउंडेशनकडून प्राथमिक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आलेले आहे.
खोपोली परिसरात सोशल मीडि-यावरील रील्स, व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या मोहापायी अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जात असल्याने जीवितहानीच्या घटनाही घडत आहेत. या घटनेनंतर झेनिथ ठाकूरवाडी मधील युवकांनी मोलाची कामगिरी बजावली होती त्यामुळे येथील तरुणांना याभागात अशी घटना घडल्यास त्यांच्याजवळ सुरक्षा साधने असावेत यासाठी खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार अभय चव्हाण यांनी सहमती देऊन सुरक्षा साधने देऊन येथील तरुणांना प्रशिक्षणही देण्यात आले आहेत.
हेल्प फाऊंडेशन बरोबर खांद्याला खांदा लावून यापुढे काम करतील असे या निमित्ताने सांगण्यात आले या धाडसी कार्याची दखल खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन हिरे यांनी घेतली असून युवकांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. याच प्रेरणेतून हेल्प फाउंडेशनने या युवकांच्या धाडसाला संघटित दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विहारी झेनिथ ठाकूरवाडी व परिसरातील युवकांना आपत्ती व्यवस्थापन, रेस्क्यू तंत्र, दोरखंडाचा सुरक्षित वापर, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर रेस्क्यू मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षा साधने, गणवेश आणि मूलभूत साहित्य उपलब्ध करून देण्याचाही संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाची पहिली पायरी म्हणून हेल्प फाउंडेशनच्या वतीने स्थानिक युवकांना रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक प्राथमिक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले. हेल्प फाउंडेशनचे सुनील पुरी,सौरभ घरत, योगेश औटी आणि निखिल ढोले यांच्या हस्ते हे साहित्य नारायण निरगुडे, कुमार ढुमने, प्रकाश निरगुडे, राकेश भगत, अक्षय जाधव, सचिन भगत आणि विहारी झेनिथ ठाकूरवाडीतील ग्रामस्थानी स्वीकारले. विहारी झेनिथ ठाकूरवाडीतील युवकांमध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि धाडस आहे.
त्या ऊर्जेला योग्य दिशा देत प्रशिक्षित, शिस्तबद्ध आणि सुसज्ज स्वयंसे वकांची स्थानिक फळी उभी करणे, हा हेल्प फाउंडेशनच्या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. भविष्यात पोलीस प्रशासन, महसूल विभाग, खोपोली नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक युवक यांच्या समन्वयातून उभारला जाणारा हा उपक्रम खोपोली परिसरातील पावसाळी पर्यटन अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्थानिकांची मदत मोलाची
यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकल्याच्या घटना घडल्या त्यात पार पाडलेल्या बचाव मोहीम आणि विशेषता 2 ऑगस्ट रोजी झालेल्या युवा पर्यटकाचा दरीत कोसळून झालेल्या मृत्यूच्या घटनेने स्थानिक युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. मुसळधार पाऊस, अंधार आणि अत्यंत कठीण परिस्थितीत विहारी झेनिथ ठाकूरवाडीतील युवकांनी हेल्प फाउंडेशन, पोलीस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्य तसेच खोल दरीतून पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.