नवसाला पावणारी तळ्याची चंडिका देवी pudhari photo
रायगड

Chandika Devi Temple : नवसाला पावणारी तळ्याची चंडिका देवी

नवरात्र उत्सवात मुंबई-पुणे येथून भक्तगण येतात

पुढारी वृत्तसेवा

तळा : संध्या पिंगळे

निसर्गरम्य अशा तळगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी राज्यभिषेकाचे निमंत्रण दिलेल्या रायगड जिल्ह्यात जास्त वतने श्री चंडिका मातेला आहेत. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आजही ग्रामदेवतेचा अध्यात्मिक वारसा मोठ्या भक्तिभावाने जोपासला जातो. चंडिका देवी मंदिर तळा गावचे प्राचीन श्रद्धास्थान आहे. तेथे चिरंतन मुल्ये जपली जात आहेत. तळ्याची श्री चंडिका देवी ग्रामदेवता आजही नवसाला पावणारी आहे. या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून या कालावधीत देवीचा दर्शनासाठी भक्तगण दुरदुरुन येत असतात.

नवरात्रात यज्ञ समजून घेतला तर यज्ञाच्या प्राचीन मूल्याची अतिशय बुद्धिगम्य माहिती समजते. सर्व वतनदार, बलुतेदार यज्ञाचे सामान गोळा करून एकत्रित होतात. वैरभाव असेल तर ते दूर होऊन त्यांच्यात मैत्री निर्माण होते. यज्ञात हवन केल्यानंतर तो शेष भाग प्रसाद म्हणून स्वीकारतात. हि शेकडो वर्षाची परंपरा आजही तळा ग्रामस्थांनी टिकवून ठेवली आहे. या मंदिराच्या परिसरात प्रवेश केला की शांती लाभते.

समाजातील सर्व स्तरातील नागरिक विषमता विसरून देवीच्या चरणाजवळ येतात. मंदिरात सामूहिक आरती करतात या मंदिराची भव्यता शांतता व स्वच्छता यांचा संगम येथे पाहवयास मिळतो. श्री चंडिंकामाता हि माहिषासुर मर्दिनी असून तळा येथील मूर्ती महिषासुराचा पाठीवर एक पाय देऊन देवी उभी आहे.

या मंदिरात पूर्वीपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. नवरात्रोत्सवात कामे वातनंदाराना वाटलेली असत. ते मोठ्या हौशीने व जबाबदारीने कामे पार पाडत असत. कुंभार घट, माती घेऊन येतो, बुरुड परड्या घेऊन व पंखा घेऊन येतो. वाणी अठरा प्रकारचे धान्य घेवुन येतो. धान्य पेरली जातात. दिव्यासाठी तेल आणले जाते. यजमान पूजा साहित्य आणतात मंत्र जागरात घटस्थापना होते. घटाभोवती मातीत धान्य पेरली जातात, घटामध्ये पाणी टाकून त्यावर परडी ठेवतात शिंप्याने आणलेले वस्त्र परडीवर ठेवल्यावर नारळ ठेवला जातो नंतर तिळाच्या फुलांची माळ चढवली जाते.

सेदररोज गोंधळाची कवने देवीसमोर म्हंटली जातात आजही सामूहिक यज्ञ केला जातो. अडचणींचा वेळी 12 वाड्यांचे गावकी एकत्र येउन निर्णय घेतात. सुख दुःखाच्या वेळी देवीची ओटी भरली जाते. दररोज नवीन साडी चोळी व दागिन्यांनी सुशोभित करतात या नऊ दिवसात गावातील ग्रामस्थ राजकीय नेते तसेच मुंबई पूणे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील भक्त याठिकाणी आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात.

दररोज सात ते आठच्या सुमारास सांजपूजा व आरती होते. यावेळी पंचपदीही म्हटली जाते. मंदिरात भजन व जागरण करण्यासाठी प्रत्येक वाडीला तिथी नुसार नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्येक वाडीचे भजन होते. अष्टमीदिवशी शतचंडीचा जप नवचंडी यज्ञ होतो. यज्ञाची सर्वकामे वाटून दिल्याप्रमाणे पार पाडतात. दसर्‍याला तर भक्तांची दर्शनासाठी रात्री उशिरपर्यंत गर्दी असते. नवरात्रोत्सवात तळ्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून भवानी देवीचे भक्त येथे मोठ्या भक्तीभावाने दर्शनासाठी येत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT