Pre Monsoon Planning Pudhari
रायगड

Pre Monsoon Planning: आपत्कालीन व्यवस्थेसाठी सुधागडात प्रशासन सज्ज; मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

संभाव्य अडचणींवर चर्चा; निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईचा तहसीलदारांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पाली: तालुक्यातील आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वमान्सून आपत्कालीन तयारीचा सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार भारत फुलपगारे , पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर उपस्थित होते.

या बैठकीस महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, काही विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत तहसीलदार कुंभार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून, बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीत तालुक्यातील धोकादायक ठिकाणे, नाले-साफसफाई, रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठ्याची अखंडता, आरोग्य यंत्रणेची तयारी, तसेच आपत्कालीन सेवांची उपलब्धता याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. महावितरण विभागाला वादळी वाऱ्यांमुळे किंवा पावसामुळे खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि धोकादायक पूल व मार्गांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

आरोग्य विभागाला आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व औषधसाठा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, साथीचे आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचेही सांगण्यात आले. ग्रामविकास व स्थानिक स्वराज्य संस्थांना नालेसफाई, पाणी साचू न देणे, तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांकडून येणाऱ्या मदतीच्या फोनकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने प्रतिसाद देण्याचे आदेशही त्यांनी दिले. नियंत्रण कक्ष प्रभावीपणे कार्यरत ठेवून 24 तास संपर्क व्यवस्था सक्षम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत विलंब टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीत प्रत्येक विभागाकडून त्यांच्या तयारीचा आढावा घेताना संभाव्य अडचणींचीही चर्चा करण्यात आली. त्या अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

आपत्कालीन परिस्थिती ही केवळ महसूल विभागाची जबाबदारी नसून सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
- उत्तम कुंभार, तहसीलदार, सुधागड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT