Water Cut (Pudhari File Photo)
रायगड

Taloja MIDC water cut: तळोजा एमआयडीसीतील ३६ तासांची पाणीबंदी मागे घ्या; उद्योग संघटनेची मागणी

३६ तासांच्या सलग पाणीपुरवठा बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची टीआयएची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: तळोजा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील प्रस्तावित ३६ तासांच्या सलग पाणीपुरवठा बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून तो मागे घ्यावा, अशी मागणी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने (टीआयए) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

पाणीपुरवठा बंदीनंतर दाब पूर्ववत होऊन सर्व औद्योगिक युनिट्सना नियमित पाणी मिळण्यास अतिरिक्त वेळ लागणार असल्याने उद्योगांचे कामकाज ४८ ते ७२ तासांपर्यंत विस्कळीत होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी (अण्णा) यांनी यासंदर्भात २६ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी प्रशासनाला निवेदन सादर केले. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जलसंवर्धनासाठी एमआयडीसीला सहकार्य करण्याची तयारी उद्योगांनी दर्शवली आहे. मात्र, संबंधित उद्योगांशी पुरेशी चर्चा न करता सलग ३६ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवणे हा व्यावहारिक पर्याय नसल्याचे टीआयएने स्पष्ट केले आहे.

पाणीपुरवठा कमी करण्याचा पर्याय स्वीकारावा

पाणीबंदीऐवजी तांत्रिक आकलनाच्या आधारे दररोज ठरावीक टक्केवारीने टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा कमी करण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी सूचना टीआयएने केली आहे. यामुळे जलसंवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करताना औद्योगिक उत्पादनावरील परिणाम मर्यादित ठेवता येऊ शकतील, असा संघटनेचा दावा आहे.

व्यावहारिक निर्णय घेण्याचे आवाहन

याशिवाय, एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करावी, भविष्यात पाणीपुरवठ्यावर मोठे निर्बंध लागू करण्यापूर्वी टीआयएशी चर्चा करावी आणि सतत प्रक्रिया सुरू असलेल्या उद्योगांच्या सुरक्षिततेचे मूल्यमापन करावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

तसेच, जलसंचरण आणि वितरणादरम्यान निदर्शनास आलेल्या पाणीगळतीची तांत्रिक तपासणी करून पाण्याची नासाडी रोखण्यावरही भर देण्यात आला आहे. जलसंवर्धन, औद्योगिक उत्पादनाची सातत्यता, कामगारांचे हित आणि औद्योगिक सुरक्षितता यांचा समतोल राखण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने उद्योगांशी समन्वय साधून व्यावहारिक निर्णय घ्यावा, असे आवाहन टीआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी केले आहे.

कामकाज २ ते ३ दिवस विस्कळीत होण्याची भीती

पाणीपुरवठा बंद राहिल्यास उत्पादनात मोठे नुकसान होण्यासोबतच उद्योगांना आर्थिक फटका बसू शकतो. विशेषतः सतत प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्यक असलेल्या उद्योगांना परिचालन आणि सुरक्षिततेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही त्याचा दाब पूर्ववत होऊन सर्व युनिट्सपर्यंत नियमित पुरवठा पोहोचण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने प्रत्यक्ष परिणाम ४८ ते ७२ तासांपर्यंत जाण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT