विक्रम बाबर
पनवेल: तळोजा एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता या अगरबत्ती बनविणाऱ्या कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. कंपनीच्या उत्पादन विभागात मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवलेले असल्याने आग अल्पावधीतच संपूर्ण युनिटमध्ये पसरली.
मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच तळोजा अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. केमिकलमुळे आग उग्र स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी फॉग प्रणालीचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी वेळीच बाहेर पडल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी होण्याची घटना घडली नाही, ही दिलासादायक बाब ठरली. या आगीत कंपनीतील कच्चा माल, यंत्रसामग्री तसेच तयार अगरबत्तींचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या उष्णतेमुळे आजूबाजूच्या भागातही काही काळ धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट, केमिकल साठवणुकीतील निष्काळजीपणा किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित यंत्रणांकडून आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
“माहिती मिळताच आमचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. केमिकलचे ड्रम असल्याने आग वेगाने पसरत होती. फॉगच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.”महेश पाटील, अग्निशमन अधिकारी, तळोजा