महाड तालुक्यातील तळीये गावावर 22-23 जुलै 2021 रोजी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील 271 बाधीत कुटूंबांना म्हाडाच्या माध्यमातून एक वर्षात घरे बांधून देण्याची घोषणा केली होती. मात्र ती वास्तवात उतरली नाही. त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारने पून्हा एकदा घरे वर्षभरात देण्याची घोषणा केली.मात्र ती देखील पूर्ण झाली नाही आणि आज तीन वर्ष झाली तरी घरे बाधीत कुटूंबांना मिळू शकलेली नाहीत आणि आता येत्या म्हणजे 2025च्या पावसाळ्यापूर्वी 227 घरे पूर्ण होतील अशी माहिती म्हाडाच्या अधिकार्यांनी दिली आहे. आता 2025 च्या पावसाळ्यापूर्वी खरच घरे मिळाणार का अशी शंकेचे पाल बाधीत कुटूंबांच्या मनात चूकचूकते आहे.
दरम्यान उर्वरित 44 घरांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे प्रस्ताव अद्याप जिल्हा प्रशासनाकडे कार्यवाहीच्या प्रतिक्षेत आहेत. तळीये दुर्घटनेमध्ये 80 पेक्षा अधिक ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले होते. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले होते. यानंतर तत्कालीन गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी म्हाडा मार्फत घरे बांधून देण्याची घोषणा केली.
ट्रान्सकॉन डेव्हलपर्स या कंपनीला जून 2022 रोजी कामांची वर्कऑर्डर देण्यात आली, मात्र पावसामुळे नोव्हेंबर 2022 मध्ये प्रत्यक्षात या कामांना सुरुवात झाली. गतवर्षी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात तळीये येथील ग्रामस्थांना त्यांच्या घरांच्या चाव्या प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आल्या होत्या.
एकूण 271 पैकी पहिल्या टप्प्यामध्ये 92 घरांचे हस्तांतर करण्यात आले असून या ठिकाणी ग्रामस्थ निवास करीत आहेत. उर्वरित 92 घरांकरिता म्हाडा विभागाकडून ना हरकत तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. एकूण या संदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळी दिलेल्या भेटीदरम्यान 200 पेक्षा जास्त घरांचे आरसीसी काम पूर्ण झाल्याचे पहावयास मिळाले, यापैकी 170 पेक्षा जास्त ठिकाणी केवळ स्ट्रक्चर उभारण्यात आले असून पॅनलची कामे सुरू आहेत.
मागील दोन वर्षात ज्या जागांवर कंटेनरमधून दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना राहावे लागत होते, त्या ठिकाणचे कंटेनर दूर करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. या कंटेनर परिसरातील जागा मोकळी झाल्यास या ठिकाणी किमान 25 ते 27 घरे बांधणे शक्य होणार आहे.
आता येत्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत 227 घरांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. उर्वरित 44 घरांच्या जमीनांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे निर्णयार्थ प्रलंबीत आहे. एकूणच मागील तीन वर्षापासून येथील ग्रामस्थांवर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात येणार्या घरांचे हस्तांतरण येत्या पावसाळ्यापूर्वी होऊन, बाधीतांना आपली हक्काची घरे मिळणे अपेक्षीत आहे.
या कामासाठी म्हाडा विभागाने सुमारे 52 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दिले होते. त्या पश्चात शासनाने 263 अधिक आठ मिळून 271 घरांसाठी सुमारे 77 कोटी रुपयांच्या प्रशासकीय प्रस्तावास मंजुरी दिली आहे . या ठिकाणी घरांचे निर्मिती वगळता अन्य कामे जसे पाणी, रोड, दिवाबत्ती ही रायगड जिल्हा परिषदे कडून करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.