महाड : गेल्या दोन ते तीन आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी शासनाने निकष बाजूला ठेवून सर्वतोपरी तातडीने मदत करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद दिले.
महाडच्या पीजी रेसिडेन्सी हॉटेलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांच्या समवेत महाडच्या माजी नगराध्यक्ष सौ स्नेहल जगताप प्रदेश सरचिटणीस नानासाहेब जगताप राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख चंद्रकांत जाधव व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व अपेक्षा कारेकर उपस्थित होत्या.
केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी भविष्यकालीन वाटचालीमध्ये देशातील कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याबाबतचे संकेत देऊन त्यासाठी आर्थिक तजवीज केली होती याची आठवण देऊन देशातील 100 जिल्ह्यांचा या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची पत्राद्वारे आपल्याला दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा मात्र मागील काही दशकांमध्ये या ठिकाणी झालेले औद्योगीकरण नागरिकरण याबरोबरच आता कृषी क्षेत्रासाठी ही विशेष योजना जाहीर झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नेहमीच्या दोन पिकांबरोबर अतिरिक्त पिके घेण्यासाठी लाभ होईल तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा विचार या योजनेतून केला जाईल असा विश्वास व्यक्त केला की योजना आगामी सहा वर्षासाठी राबविण्यात येणार असून याकरिता राज्यातील गोदामांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या वाटचालीमध्ये शेतकरी वर्गाचा असलेला वाटा लक्षात ठेवून निर्यातीमध्ये या माध्यमातून मिळणारे उत्पन्न विचारात घेता ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास खासदार तटकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला रायगड जिल्ह्यातील तसेच कोकणातील शेतकऱ्यांनी यासंदर्भात वैविध्यपूर्ण पद्धतीने आपल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत याकरिता जिल्हा राज्य व केंद्र स्तरावर स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्यात येणार असून आपण लोकसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून या संदर्भातील समितीवर सातत्याने लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मागील दोन ते तीन आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र मध्ये घातलेला धुमाकूळ व नागरिकांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने या संदर्भातील असलेले सर्व निकष बाजूला ठेवून शेतकरी वर्गाला व नागरिकांना अत्यावश्यक असणारी मदत तातडीने द्यावी असे आवाहन आपण पक्षाच्या वतीने राज्य शासनाला करीत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
पोलादपूर येथे सकाळी झालेल्या विविध विकासात्मक विषयांसंदर्भातील आढावा बैठकीमध्ये पोलादपूर मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विविध विभागातील कामांबाबत तक्रारी छायाचित्रासह आपल्याकडे केल्या असून या संदर्भात आपण उचित कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला निर्देश दिल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल स्पष्ट केले.