Sunil Tatkare, mhendra thorve 
रायगड

Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरें यांचा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा

रक्तरंजित राजकारणाच्या आरोपावरून माणगांव दिवाणी न्यायालयात खटला दाखल, रायगडमधील राजकारणा संर्घष वाढणार

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध मानहानीचा हा खटला दाखल केला आहे. थोरवे यांनी केलेल्या गंभीर आणि निराधार आरोपांमुळे आपली जनमानसातील प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत खासदार तटकरे यांनी ६५ कोटी ३ हजार रुपयांच्या नुकसानीची मागणी या दाव्यात केली आहे. हा खटला माणगाव येथील दिवाणी न्यायालय-वरिष्ठ स्तर या न्यायालयात दाखल करण्यात आला असून, यासाठी ३ लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्कही भरण्यात आले आहे.

आमदार थाेरवे यांचे गंभीर आराेप

खाेपाेली नगरपरिषदेच्या निवडणूकीतील राजकीय वादातून खाेपाेली मधील मंगेश काळाेखे यांची हत्या झाली हाेती. त्या हत्येनंतर २७ डिसेंबर २०२५ रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. रायगडमध्ये 'रक्तरंजित राजकारण' सुरू असून, सुनील तटकरे हे जिल्ह्याचे 'आका' असल्यासारखे वागत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जीवे मारले जात आहे, असा आरोप थोरवे यांनी केला होता. तसेच, 'मंगेश' नावाच्या व्यक्तीच्या हत्येमागे सुनील तटकरे यांचा हात असून हे सर्व 'प्री-प्लॅनिंग' असल्याचा दावाही त्यांनी केला होता असे दाव्यात नमुद करण्यात आले आहे.

खोटे आरोप राजकीय हेतूने प्रेरित

खासदार सुनील तटकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या तीन दशकांच्या सार्वजनिक कारकीर्दीत आपण अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, अशा प्रकारचे खोटे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.थोरवे यांच्या विधानांमुळे आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि दहशत पसरवणारी ठरवली जात असून, यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी दाव्यात नमूद केले आहे.खासदार तटकरे यांनी दाव्यात केलेल्या मागण्या

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि मानहानीकारक असल्याचे जाहीर करावे. आणि खासदार तटकरे यांची बदनामी करणारे व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावेत आणि भविष्यात असे विधान करण्यास थोरवे यांना मनाई करावी. या दाेन मागण्यांसह आपल्याला झालेल्या मानसिक आणि सामाजिक नुकसानीसाठी ६५ कोटी ३ हजार रुपयांची भरपाई मिळावी, अशा मागण्या खासदार तटकरे यांनी या दाव्यात केल्या आहेत. या प्रकरणामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता न्यायालय यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यामधील रायगडमधील राजकीय संघर्ष अधिक तिव्र हाेणार असे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT