महाड ः चवदार तळे सत्याग्रह शताब्दीच्या निमित्ताने महाड येथे महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक तसेच संग्रहालय केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारले जावे,अशी आग्रही मागणी रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे.याबाबतचा सविस्तर प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
खा.सुनील तटकरे यानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाला 2027 साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व संग्रहालय उभारले जावे,अशी आग्रही मागणी त्यांनी केली. महाडचा सत्याग्रह हा देशाच्या नैतिक, सामाजिक व घटनात्मक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी केलेला चवदार तळे सत्याग्रह हा समता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या लढ्याचे एक ऐतिहासिक प्रतीक आहे. शताब्दी वर्षानिमित्त महाडच्या या ऐतिहासिक वारसा स्थळाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देण्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक व सखोल चर्चा झाली.