रोहे: रायगड म्हणजे केवळ जिल्हा नाही तर रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे. स्वराज्याला राजा देणारी ही भूमी आहे. त्यामुळे ही प्रत्येक मराठी माणसाची प्रेरणा आणि अस्मिता असलेली भूमी आहे. याच रायगड जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि सामाजिक समतेचा एक नवा इतिहास लिहिला. असे उदगार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. त्या रोहा अष्टमी नगरपरिषदेतील विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या कोकण म्हणजे साक्षात देवभूमी निसर्गाने भरभरून दान दिलेली ही भूमी आणि कष्टाळू माणसाने घडविलेली भूमी आहे. दादांचं कोकणावर जास्त प्रेम होतं. कोकणातला माणूस हा साधा आहे प्रामाणिक आहे. मेहनती आहे आणि म्हणूनच कोकणचा विकास हा महाराष्ट्राचा विकासाचा कणा आहे. राज्याच्या विकासाची कुठलीही चर्चा निघाली की दादा नेहमीच कोकणाची बाजू घ्यायचे. इथला शेतकरी, मच्छिमार बांधव, युवक, युवती आणि कोकणी संस्कृती या साऱ्यांविषयी त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता. खरोखरच ते मनापासून होतं कारण कोकणात कधीतरी तटकरे साहेबांनी सांगितलं किंवा कुठल्याही लोकांनी सांगितलं तरी ते नेहमीच कोकणात यायला तयार असायचे. आजचे काम रोह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे असेही त्या म्हणाल्या.
रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीतील कुंडलिका नदी किनारी पुरसंरक्षक भिंत बांधणे व विविध कामे करणे, कुंडलिकानदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करणे, धावीर महाराज मंदिर येथे भक्तनिवास नुतनीकरण कामांचे भूमिपूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉ. सी.डी. देशमुख सभागृह येथे बोलत होत्या.
यावेळी खा.सुनील तटकरे, ना.आदिती तटकरे, मा.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मुश्ताकभाई अंतुले, जिप उपाध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, ॲड राजीव साबळे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, मुरुड नगराध्यक्षा दांडेकर, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, स्नेहल जगताप, आराधना दांडेकर, अंकीत साखरे, गटनेते महेंद्र गुजर, राजेंद्र जैन, निता हजारे, महेंद्र दिवेकर, संतोष पोटफोडे, समिर शेडगे आदी उपस्थित होते.
यावेळी खा.सुनील तटकरे यांनी विकास पुरुष म्हणुन दादांना महाराष्ट्राने अनुभवले. त्यामुळे दुसरे दादा होणे नाही. आपण त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून आपले सुरुवातीलाच मी अंतकरणापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. दादांनी विकासासाठी ताकत व शक्ती दिली.आपली साथ आम्हाला उपयुक्त आहे. कोकणावर दादांचे प्रेम होते. कोरोणाच्या काळात काम करणारे एकमेव दादा होते.मी पोरका झालो. दादांची आठवण येत नाही असे दिवस जात नाही.
ना आदीती तटकरे यांनी अजितदादांशी अलिखीत करार होता असे सागिंतले. जसे बारामती मध्ये कार्यक्रम होतात तसे श्रीवर्धन मध्ये कार्यक्रम व्हावे हा अलिखित करार होता. दादा नेहमी म्हणायचे जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो दर्जेदार व्हावे. आज नदी संवर्धन चा पुढचा टप्पा १२.३० कोटींच्या कामाचे भूमिपूजन आज होत आहे.यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यकर्ते म्हणुन मला दादांचा अभिमान आहे. त्यांच्याकडून प्रोत्सहन व प्रेरणा आम्हाला मिळत आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रफीत दाखविण्यात आले.सुत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले. तर आभार मानताना वनश्री शेडगे यांनी आजचा कार्यक्रम ऐतिहासिक सोहळा मैलाचा दगड आहे. असे सांगितले.
खरंतर अदिती माझी मुलगी.रायगड जिल्ह्यावर माझं पहिले लक्ष असेल ही मी ग्वाही देते कारण अदिती किंवा तटकरे साहेब दादा नंतर वहिनींचे लक्ष असेल की नाही असं त्यांना वाटतंय. पण मी एक जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून आणि कोकणावर माझंही प्रेम असल्यामुळे आणि आदिती आणि तटकरे साहेबांचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध असल्यामुळे नक्कीच या विभागावर दादांनी इतकच माझंही लक्ष राहील अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली