सुधागड ः रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेती नापीक व ओसाड आहे. मुबलक पर्जन्यवृष्टी होऊनही येथे केवळ भात शेती केली जाते. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक म्हणजे शेती तोट्यातच आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोलादपूर तालुक्यातील डोंगरावर वसलेल्या गोवेले गावातील प्रयोगशील शेतकरी भगवान कोंडीराम अहिरे (वय 55) यांनी आधुनिक तंत्रज्ञान व मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतीमध्ये नंदनवन फुलवले आहे. सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन सुद्धा ते करत आहेत.
भगवान अहिरे यांनी 1990 पासून शेती व्यवसाय सुरु केला. ते आपल्या 25 एकर शेतीमध्ये विविध प्रकारची शेती करत आहेत. चार सूत्री भात लागवड, सेंद्रिय हळद लागवड त्याच बरोबर उन्हाळ्या मध्ये भुईमूग, चवळी, हरभरा भाजीपाला इत्यादी पिके घेत आहेत. दुग्ध व्यवसाय, कुकूटपालन, सेंद्रिय शेती, उन्हाळा मध्ये बागायती शेती, 2 एकर मध्ये आंबा लागवड केली आहे. सद्या त्यांच्याकडे 200 आंब्याची झाडे आहेत.
तुकड्यांची शेती पाणीटंचाई यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेती करत नाहीत. मात्र भगवान अहिरे यांनी आपल्या जमिनीची चांगल्या पद्धतीने निगा ठेवली. पोलादपूर मध्ये पाणी टंचाई आहे. परंतु कमी पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी शेती करणे सोडले नाही आहे. सोबतच ते ठिबक सिंचन चा वापर करत आहेत. जोडीला शेततळे सुद्धा बांधले आहे.
नावीन्य पूर्ण काम म्हणजे त्यांनी शेतीचे माकडांपासून संरक्षण व्हावे म्हणून सोलर कुंपण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांच्या मुलाला सुजल अहिरे यांना असल्यामुळे हे शक्य झाले. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना त्यांचा लाभ ते घेत आहेत. आणि त्यांचा आदर्श परिसरातील शेतकर्यांनी घेतला आहे. भगवान अहिरे यांना पंचायत समिती व कृषी विभाग कडून शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. तसेच विविध सेवाभावी संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. शेतीतील नवनवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते विविध अभ्यास दौरे देखील करत असतात.
प्रतिकूल परिस्थितीवर मात घरची परिस्थिती तशी व बेताची होती. वडिल पुर्वीपासुन समाजसेवेत आणि समाजसेवा करत. 25 एकर शेतीमधील 10 एकर शेती मध्ये भात नाचणी व इत्यादी पिके घेत असत व जोड व्यवसाय म्हणुण दुग्धव्यवसाय होता. भगवान अहिरे यांचे प्राथमिक शिक्षण गावाताच झाले नंतर पुढील शिक्षणासाठी गावापासुन शहरी भागाकडे पाच किलोमीटर अंतर कापावे लागायचे व सोबत 20 लिटर दुध डोक्यावर घेऊन जावे लागयचे.
घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडुन दिले. त्यांनी लग्न झाल्यावर असे ठरवले की आपण आता आधुनिक शेती करायची. आणि सुरवातीला लगेच मोठा व्यवसाय करणे शक्य नव्हते म्हणुन ठरवले की शेतीला आधारित जोड व्यवसाय सुरू करावा. मग शेती मध्ये 2003 पासुन उन्हाळी हंगामामध्ये भुईमुग, मका, टॉमेटो, गहु, मिरची, फरसबी व कलिंगड इत्यादी पिके घेण्यास सुरवात केली. 2004 मध्ये 3 महिन्यात तब्बल 60 हजार रूपये किमतीची फरसबी वाशी बाजारपेठेत येथे पाठवली होती. हे सर्व करत असताना त्यांना पत्नीची साथ मिळाली, पत्नीचे निधन झाल्यावर मुलांची व बहिणीची साथ मिळाली.