Sudhagad Bhorai Devi Temple Pudhari
रायगड

Sudhagad Bhorai Devi Temple: सुधागड किल्ल्यावर विराजमान भोराई देवी! जाणून घ्या या ऐतिहासिक दुर्गाचे धार्मिक महत्त्व

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक सुधागड दुर्गावर विराजमान भोराई देवी; निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

पुढारी वृत्तसेवा

हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावर व्हावी यासाठी प्रथम निवडलेल्या किल्ल्यांपैकी सुधागड किल्ला हा एक त्यापैकी राजधानी साठी मंत्रिमंडळाने निवडलेल्या दुर्ग सुधागडची पाहणी करण्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे पदस्पर्श लाभलेल्या प्रसिद्ध ऐतिहासिक सुधागड किल्ला आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नैसर्गिक साधन संपन्नतेने नटलेल्या सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धस्थान आहे.

अश्विन नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर असंख्य भाविक येतात. श्रावणात देखील देवीच्या दर्शनाला काही प्रमाणात भाविक येतात. नवरात्रात येथे भाविकांची उदंड गर्दी पहायला मिळते. त्यांच्या उत्साहाला उधाण येते.घटस्थापनेपासून देवीच्या दर्शनासाठी सुधागड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक येण्यास सुरुवात होते.

शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो.हजारो भक्तगण किल्ल्यावर येऊन देवीच्या पायी नतमस्तक होतात. श्री भोराई देवस्थान मंडळाचे विश्वस्त नवरात्रोत्सवात मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, सायंकाळी आरती, रात्री किर्तन असा कार्यक्रम असतो.

अष्टमीच्या दिवशी गडकर्‍यांना मानाप्रमाणे नारळ व मानाचे विडे दिले जातात. शिलंगणाचे दिवशी पालखी निघते. नवरात्रात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो. महाप्रसादासाठी लागणारे सर्व भोजन साहित्य हे सुधागडातील हजारो भक्तगण किल्ल्यावर जाताना आपल्याला झेपल तेवढे घेऊन देवस्थानकडे जमा करतात.

त्यातूनच येणाऱ्या भाविकांच्या प्रसादाची सोय ट्रस्ट करत आहे.प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगु ऋषींनी केलेली आहे असे म्हंटले जाते. म्हणून या देवीला ‘भृगूअंबा, भोरांबा, भोराई’ अशीही नावे आहेत.

मूळ चंडीकेचे स्वरुप असणारी श्री भोराई चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, खङग-खेटक आणि दोन हातात आसूड आहे. श्री भोराईदेवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंतसचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदेवता/कुलस्वामिनी म्हणून मानले.

पंतसचिव चिमणाजी रघुनाथ उर्फ नानासाहेबांनी पुत्रप्राप्ती झाल्यानंतर येथे १० दिवसांच्या आश्विन नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. किल्ल्यावर नवरात्रीमध्ये नवरात्र उत्सव होतो. सचिवांच्या काळात तालुक्यातील न्याय निवाडे नवरात्री उत्सवात केले जायचे. सुधागडांमधील प्रलंबित असलेले न्यायनिवाडे यांचा न्याय मिळवण्यासाठी भक्तगण किल्ल्यावर जात असत.

किल्ल्यावर जाण्यापूर्वी सिद्धेश्वर जवळ असलेल्या २१ गणपतीला कळ लावण्याची प्रथा होती. किल्ल्यावर गेल्यावर माझ्या बाजूनेच न्याय मिळावा यासाठी भगवंताकडून कल घेतला जायचा अशी महती सांगितली जाते. त्यावेळच्या भोर संस्थानाने देवीच्या दिवाबत्तीची आणि पूजा अन सेवेसाठी खूप मोठ्या पद्धतीने योजना आखून ठेवली आहे.

भोर संस्थानाने श्रीपोराई मातेच्या नावे शेकडो एकर जमीन ही सुधागडाच्या आजूबाजूस आजही असल्याचे सांगितले जाते .तसे शासनाच्या दरबारी त्याची लेखी स्वरूपात नोंदही आहे .त्या असलेल्या जमिनीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर देवीच्या वर्षभराचे सर्व सण उत्सव परंपरा राखल्या जात आहेत.देवीच्या उत्सवासाठी सुधागडचे माजी सभापती आणि नेते कै .नामदेवशेठ खैरे आणि त्यांचे सहकारी मारोतराव देशमुख हे अनेक वर्ष नवरात्र उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी दहा दिवस किल्ल्यावर तळ ठोकून असायचे आणि देवीची सेवा करायचे.

आजही अनेक जण किल्ल्यावर दहा दिवस राहून देवीची सेवा करतात. किल्ल्याचा परिसर हा विस्तीर्ण असल्याने किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभल्याने वर्षभर या किल्ल्यावर पर्यटक पाच्छापूर किंवा धोंडसे मार्गे गड चढून जातात. त्यामुळे वर्षभर या किल्ल्यावर पर्यटक आणि भक्तगणांची रेलचेल असते.

सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाछापूर, धोंडसे, पोटलंज या परिसरातील ग्रामस्थ शेतीची कामे झाल्यानंतर आपली असणारी म्हशी बैल हे किल्ल्यावर चरण्यासाठी व राखण्यासाठी म्हणून पाठवतात . नवरात्र उत्सव संपला कि पुन्हा किल्ल्यावर पाठवण्यात आलेली गुरे ढोरे आपल्या गोठ्यात आणून बांधतात. त्यामुळे गुरांच्या चारा चा प्रश्न हा किमान तीन महिने पूर्ण होत असल्याचे सांगितले जात आहे.

किल्ल्यावर सोडण्यात आलेल्या गाई ,बैल, टोणगे ह्या शेतकरी धनाचे रक्षण हे भोराई माताच करत असल्याची भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करतात.देवीच्या दर्शनासाठी किल्यावर येणारे भाविक आजुबाजूचा गर्द झाडीने नटलेला मनोहारी परिसर, वाहते धबधबे, नद्या, डोगररांगा, थंड हवा यांचाही आनंद लुटत असतात. शिवाय या ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक वास्तूंना भेट देतात. त्यामुळे पर्यटक अन भक्तांना तिहेरी पर्यटनाचा आंनद मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT