सुधागड तालुका जलमय; खोपोली-वाकण महामार्ग बंद pudhari photo
रायगड

Sudhagad heavy rain : सुधागड तालुका जलमय; खोपोली-वाकण महामार्ग बंद

२२२ मि.मी. पावसाची नोंद; ग्रामीण भागाचा संपर्क विस्कळीत; तरारलेले भात राब पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

रायगड : शरद निकुंभ

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शनिवारी सकाळी ते रविवारी सकाळपर्यंत तब्बल २२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर संततधार पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील बहुतांश नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने ग्रामीण भागाचा संपर्क तुटला असून खोपोली–वाकण राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील जंगली पीर, उन्हेरे फाटा, मोरटाकी तसेच जांभुळपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी आल्याने गावांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नदी-नाल्यांच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रविवारी सकाळपर्यंतही पावसाची संततधार कायम असून हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज शाळांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची वेळ आली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टळला असून विद्यार्थी सुरक्षितपणे आपल्या घरी आहेत. प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

प्रशासनाचे लक्ष

अंबा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने संवेदनशील ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना पाण्यात उतरण्यास किंवा पूरग्रस्त भागात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT