सुधागड : संतोष उतेकर
सुधागड तालुका हा प्राचीन आणि भव्य लेण्यांच्या अमूल्य ठेव्याने नटलेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठाणाळे, नेणवली, गोमाशी आणि चांभार लेणी समूहाच्या रूपाने येथे भारतीय संस्कृती, बौद्ध कालीन इतिहास आणि अप्रतिम शिल्पकलेचा भक्कम पुरावा पाहायला मिळतो.
चौल बंदरापासून नागोठणे मार्गे देशावर जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर वसलेला हा लेणी समूह आजही इतिहासप्रेमी, बौद्ध अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आकर्षणाचे केंद्र आहे. ठाणाळे लेणीची २२०० वर्षांची समृद्ध परंपरा आहे. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ.स. ५ व्या शतकापर्यंतचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या ठाणाळे लेणी समुहात चैत्यगृह, स्तूप, सभागृह आणि २१ विहारांचा समावेश आहे.
पश्चिमाभिमुख असलेल्या या लेण्यांमध्ये वाकाटककालीन रंगीत चित्रांचे दुर्मीळ अवशेष, प्राकृत ब्राह्मी लिपीतील शिलालेख आणि पाण्याचे उत्कृष्ट टाके पाहायला मिळतात. कोकणातून घाटावर जाताना भिक्षूंसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी हे मुख्य विश्रांतीस्थान होते. विशेष म्हणजे, क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही या चिवरदांड जंगलातील लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.
सह्याद्रीच्या कुशीत खडसांबळे व नेणवली गावाजवळ २१ लेण्यांचा प्राचीन समूह आहे. यातील २१ मीटर बाय १६ मीटरचे अतिविशाल सभागृह हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सभागृहांपैकी एक मानले जाते. याच्या जवळच चांभार लेणी असून, गोमाशी येथील डोंगरात भगवान बुद्धांची आकर्षक प्रतिमा कोरलेली आहे.
ठाणाळे लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये
बेसाल्ट (अग्निजन्य) दगडात कोरलेली ही लेणी २२०० वर्षांपूर्वीची असून मोर्यकालीन चांदीची नाणी येथे सापडली आहेत. ५ पायऱ्या असलेल्या एका विहारात वाकाटककालीन चित्रांचे अवशेष, प्राकृत ब्राह्मी शिलालेख आणि पाण्याचे टाके आहेत. चौल-धरमतर-नागोठणे मार्गे देशावर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे हे केंद्र होते. तसेच क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा हा आश्रयदुरुस्त मार्ग होता.
नेणवली व गोमाशी लेण्यांची वैशिष्ट्ये
नेणवली येथे २१ मीटर x १६ मीटर आकाराचे विशाल आयताकृती सभागृह आहे, ज्याच्या डाव्या व मागील भिंतीत १७ खोल्या व दगडी ओटे आहेत. सभागृहाच्या मागच्या बाजूस १.५ मीटर व्यास आणि ३.५ मीटर उंचीचा दगडात कोरलेला भव्य घुमट आहे. गोमाशी येथील डोंगरातील घळीमध्ये १.५ मीटर उंचीची भगवान बुद्धांची आकर्षक प्रतिमा कोरलेली आहे.