रायगड : अलिबाग शेगाव, आग्राव बोरीवली, महाजने-परळ, रेवदंडा-कल्याण या एसटी बसेस यापुर्वी सुरू होत्या. परंतु वेगवेगळी कारणे दाखवून त्या बंद करण्यात आल्या आहेत. थेट जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा फायदेशीर ठरत आहे. या मार्गावरील एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी रायगडचे विभाग नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली आहे. परंतु मागण्यांकडे त्यांचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रायगड एसटी प्रेमींनी केला आहे.
विभाग नियंत्रकाचा मनमानी कारभार जिल्ह्यात चालू असल्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे सांगण्यात आले आहे. शेगाव, मुंबई, परळ, कल्याण, बोरीवली या ठिकाणी ग्रामीण भागातील मंडळी नोकरी, व्यवसायाबरोबरच कामानिमित्त ये-जा करतात. मागील लॉकडाऊनच्या काळात या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे संकट संपल्यावर अलिबाग-शेगाव, आग्राव बोरीवली, महाजने-परळ, रेवदंडा कल्याण एसटी बसेस पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षापासून या बस सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. प्रत्येक वेळी चालक, वाहक नाहीत, अशी कारणे देऊन विभाग नियंत्रक ही मागणी टाळत असल्याचा आरोप रायगड एसटी प्रेमींकडून करण्यात आला आहे. रायगड विभागातील इतर आगारातून नवीन मार्ग सुरू करण्यासाठी चालक, वाहकांची कमतरता भासत नाही. मात्र, अलिबाग-शेगावसह अन्य बस से वेसाठी दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलिबाग आगारातून महाजने येथून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परळ एसटी बस सुरू होती. ही सेवा कोरोना काळात बंद केली. त्यानंतर पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रवासी नसल्याचे सांगून जबाबदारी ढकलण्याचे काम केले जात आहे. अनेक वर्षांपासून नियमित सुरू अस लेली आग्राव बोरिवली बस सेवा बंद करण्यात आली. त्यावेळीही चालक, वाहकांची कमतरता हेच कारण देण्यात आले होते. मात्र, आता नव्याने अलिबाग-बोरीवली शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे.
या शिवशाहीसाठी चालक, वाहक कुठून आले, असा प्रश्न एसटी प्रेमींकडून विचारला जात आहे. अलिबाग- बोरीवली ऐवजी रेवदंडा बोरीवली ही सेवा सुरू करण्याची त्यांची मागणी विभाग नियंत्रकांनी दुर्लक्षित केले आहे. एसटीला ग्रामीण भागातील जीवनवाहीनी म्हणून ओळखले जाते. स्थानिक व ग्रामीण प्रवासी संख्या वाढावी, गावे, वाड्यांपर्यंत एसटी पोहचली आहे. हात दाखवा, आणि प्रवासी मिळवा, अशा अनेक योजना राबवून ग्रामीण भागातील प्रवासी वाढविण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ विभागाने केला आहे.
मात्र, रायगड विभाग नियंत्रकांना अलिबागच्या बस सेवेशी आणि प्रवासी मागणीशी काहीच देणे घेणे नाही असा आरोप रायगड अमित कंटक यांच्याकडून करण्यात आला आहे. ग्रामीण भागात एसटी बससेवा पोहचावी, ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीची चांगली सेवा मिळावी, म्हणून अलिबाग शेगाव, महाजने परळ, रेवदंडा- बोरीवली एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. अर्जाची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे रायगड एसटी प्रेमींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली आहे.
ज्यादा गाड्यांना कायम मंजुर चालक, वाहकांची कमतरता असल्याचे कारण देत अलिबाग-शेगावसह अन्य मार्गावरील बस सेवा सुरू केली जात नाही. मात्र रायगड विभागात उन्हाळ्यात सुरू केलेल्या काही ज्यादा गाड्यांना कायमस्वरूपी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अलिबाग-जळगाव, पेण-भगवानगड, कर्जत-तुळजापूर, रोहा-बीड, माणगाव-अहमदपूर या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना प्रवाशांची मागणी नसतानाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगितले जाते.
चालक वाहकांच्या कमतरतेमुळे सेवा सुरू करणे कठीण आहे. अलिबाग-शेगाव वगळता अन्य सेवा सुरू करण्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न राहील.दीपक घोडे, विभाग नियंत्रक