महाड : मुंबई-गोवा महामार्गावर नांगलवाडी येथे खेड-विरार एसटी बसला मंगळवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खेडहून विरारकडे जाणाऱ्या भुसावळ आगाराच्या गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. परिस्थितीची जाणीव होताच चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडी बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर प्रवाशांशी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की, चालकाने धूर दिसताच तातडीने प्रवाशांना सतर्क केले आणि गाडीतून उतरवले. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसीचे फायर फायटर आणि एमआयडीसी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच महाड एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री. फुलपगारे हेही घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी अन्य बसची व्यवस्था करून मुंबईकडे पाठवले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस सूत्रांनी दिली.