अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. शिक्षण मंडळाकडून सलग चौथ्या वर्षी शुल्कवाढ केली आहे. शुल्कवाढीमुळे पालकवर्गात नाराजीचा सूर आहे.
मागील वर्षी शिक्षण मंडळाने शुल्कवाढ केली होती. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मार्च 2025 मध्येच बारा टक्क्यांनी शुल्कवाढ केली होती. आता पुन्हा मार्च 2026 साठी वाढ लागू केली आहे. एवढेच नव्हे तर प्रमाणपत्रे, गुणपत्रक लॅमिनेशन व इतर बाबींसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार असल्याने पालकांच्या खिशावर आर्थिक ताण येणार आहे.
शिक्षण मंडळाने प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व परीक्षा संचालनाशी संबंधित खर्च वाढल्याचे कारण दिले असले तरी प्रत्यक्ष हा भार पालकांनाच पेलावा लागणार आहे. दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी आधी 470 रूपये असलेले शुल्क आता थेट 520 रूपयांवर नेण्यात आले आहे. तर इयत्ता बारावी परीक्षेचे शुल्क 490 वरून 540 रूपये करण्यात आले आहे.
अशी असेल शुल्कवाढ
गतवर्षी दहावी-बारावी परीक्षा शुल्कात 12 टक्क्याने वाढ केली होती. यावर्षी पुन्हा वाढ लागू केली आहे. दहावीचे शुल्क 470 ऐवजी 520 रूपये तर बारावीचे शुल्क 490 ऐवजी 540 रूपये केले आहे. 470 रूपये असलेले शुल्क आता थेट 520 रूपयांवर नेण्यात आले आहे. तर बारावीचे शुल्क 490 वरून 540 रूपये करण्यात आले आहे.
परीक्षा शुल्कवाढीची कारणे
प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व परीक्षा संचालनालयाच्या वाढलेल्या खर्चामुळे परीक्षा शुल्कामध्ये वाढ केल्याचे सांगण्यात येत असून याचा फटका पालकांना बसणार आहे. यंदा झालेली अतिवृष्टी, अनेक जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे शेतकरी वर्गावर अस्मानी संकट कोसळले आहे. आता दसरा दिवाळीपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दणका दिला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एकीकडे सर्वांना मोफत शिक्षण असे सांगितले जाते मात्र वारंवार शुल्क वाढ केली जात असल्याने शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणली जात असल्यामुळे शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा.रमेश म्हात्रे,-पालक