Panvel Highway Traffic | गणेशभक्त परतीच्या वाटेवर: सायन-पनवेल महामार्ग ठप्प! 
रायगड

Panvel Highway Traffic | गणेशभक्त परतीच्या वाटेवर: सायन-पनवेल महामार्ग ठप्प!

मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतूक कोंडीत; कळंबोली ते बेलापूर वाहनांच्या रांगा, कळंबोली सर्कल ते टी-पॉइंट परिसरात प्रचंड कोंडी

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : गणेश विसर्जनानंतर मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या वाढल्याने सायन-पनवेल महामार्गावर शनिवारी वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कळंबोली पासून खारघर, बेलापूर पर्यंत अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याचे चित्र आहे. कळंबोली सर्कल ते टी-पॉइंटदरम्यान वाहतूक मोठ्या प्रमाणात संथ झाली असून, काही ठिकाणी वाहनांचा वेग जवळपास थांबला आहे.

शुक्रवारी दहा दिवसांच्या गणरायांना निरोप दिल्यानंतर मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधील अनेक गणेशभक्तांनी शनिवारी सकाळपासून पुन्हा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढली. खासगी कार, एसयूव्ही तसेच अन्य वाहनांची मोठी गर्दी झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.

कळंबोलीत वाहतुकीचा सर्वाधिक फटका

पनवेलकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कळंबोली परिसरात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कळंबोली सर्कल ते टी-पॉइंटदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या असून, वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कळंबोली सर्कल हा पनवेल, जेएनपीटी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि सायन-पनवेल महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक बिंदू असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचा परिणाम दूरपर्यंत जाणवत आहे.

बेलापूरकडून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या तसेच पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली. परिणामी प्रवाशांना नेहमीच्या तुलनेत अधिक वेळ प्रवासात घालवावा लागत आहे.

विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाचा परिणाम

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिकांनी कोकणासह विविध भागांत प्रवास केला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर शुक्रवारी गणरायांचे विसर्जन झाल्याने शनिवारी सकाळपासून नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने महामार्गावर आल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला.

दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वाहनचालकांना मार्गावरच बराच वेळ थांबावे लागत असून, कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. महामार्गावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT