खालापूर : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाम तेलाने भरलेला टँकर उलटून त्याला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातानंतर टँकरच्या केबिनमध्ये चालक अडकल्याने काही काळ घटनास्थळी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, विविध मदत यंत्रणांनी तत्परतेने बचाव कार्य राबवून चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.
टँकरचालक इर्शाद अहमद रहमान (वय २७, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) हा टँकर (एम.एच. ०४ केएफ ७६१४) मध्ये पाम तेल भरून घेऊन बंगळूर येथून तळोजाच्या दिशेने जात होता. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनच्या कि.मी. क्रमांक ३५ येथे दुपारी सुमारे १२.२० वाजता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उलटला. त्यानंतर टँकरला लगेच आग लागली.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मदत यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केले. टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, टँकरला लागलेली आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेड यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या अन् अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.