महाड : पुढारी वृत्तसेवा
महाडच्या सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा एकदा परवानगी मिळाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाडमध्ये पुर येऊ नये यासाठी नदीतील गाळ उपसण्याचे हे काम केले जात आहे. पावसाळा तोंडावर आला असून पाच ते सहा ठिकाणी पुर्ण क्षमतेने गाळ उपसण्याचे काम केले जाणार आहे. या करता 20 कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती गोगावले यांनी दिली आहे.
जून 2021 मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर स्थानिक नागरिकांच्या असलेल्या गेल्या दहा ते बारा वर्षांच्या नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत समस्ये कडे शासनाने प्राधान्याने लक्ष देऊन 22 व 23 या वर्षी नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.
याचा दृश्य लाभ महाडकर नागरिकांना 23 व 24 यावर्षी महापुरापासून पूर्णपणे फायदा झाल्याचे दिसून आले. मात्र मागील वर्षी व चालू वर्षी आतापर्यंत नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासकीय निर्णय प्रतीक्षेत होता. या संदर्भात मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शासन दरबारी महाडकरांची असलेली ही ज्वलंत समस्या स्पष्ट करून पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामी मंजुरी मिळावी अशी आग्रही मागणी केली होती. ती शासनाने मंजूर केली असून त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
यामुळे नागरिकांची असलेली मागणीची पूर्तता झाली आहे. आगामी वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या गाळ काढण्याच्या मोहिमेचा लाभ महाडकरांना होणार आहे.
मंत्री भरत शेठ गोगावले यांनी यासंदर्भात महाड पूर निवारण समिती व स्थानिक नागरिकांकडून आलेल्या पाठपुराव्याची दखल गंभीरपणे घेऊन त्यावर मार्ग काढला. त्या बद्दल महाड पूर निवारण समिती व स्थानिक नागरिकांकडून मंत्री भरत शेठ गोगावले यांना धन्यवाद देण्यात आले.