Siddheshwar Nadsur Ganesh Temple in Pali 
रायगड

Siddheshwar Nadsur Ganesh Temple in Pali-पालीत सिद्धेश्वर नडसूर गणेश मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान

ऋषींमुनींनी तपश्चर्या करून भारतात २१ गणेश मंदिरांची केली होती स्थापना

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

श्री क्षेत्र अष्टविनायकाप्रमाणे ऋषीमुनींनी तपश्चर्या करून २१ गणेशांची स्थापना केली होती. यामधीलच एक मंदिर पालीजवळ पहायला मिळत आहे. हे पुरातण मंदिर सिद्धेश्वर नडसूर या नावाने ओळखले जाते.

श्री गणेश देवतेची प्रसिद्ध असलेली अनेक स्थाने भारतमध्ये आहेत. या विविध स्थानांच्या वेगवेगळ्या कथाही सर्वत्र प्रचलित आहेत. कार्यसिद्धसाठी खुद्द देवांनी सुद्धा श्री गणेशाची स्थापना केली आहे. काही ठिकाणी ऋषीमुनींनी तपश्चर्या करून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे तर प्रसंगी भक्त्ताच्या हाकेला धावून स्वतः श्रीगणेश काही ठिकाणी प्रगट झालेले आहेत. देवादिकांना दैत्याबरो-बरच्या युद्धात जय मिळविण्यासाठी, दृष्टांचं निर्दालन करण्यासाठी, शापातून मुक्त होण्यासाठी, इच्छित फलप्राप्तीसाठी श्रीगणेशाची स्थापना सर्वकाळामध्ये सर्व ठिकाणी झालेली आहे. या प्रत्येक ठिकाणाला पौराणिक इतिहास आहे. अशाच पुरातन व प्रसिद्ध ठिकाणांच्या निवडक २१ गणपतींचे एकत्रित मंदिर फार पूर्वी सिद्धेश्वर गावाजवळ बांधण्यात आलेले होते.

सिद्धेश्वर नाडसूर रस्त्यावर पाली गावापासून ४ कि.मी. अंतरावर एकवीस गणपर्तीचे मंदिर आहे. फार पूर्वी या भागात मनुष्य वस्ती होती. इ.स. पूर्व शतकापासून या भागातील मार्गाचा उपयोग केला जात होता, जमिनी खालील दगडात खोदलेली पाण्याची टाकी आजही या भागात आढळून येतात. यानंतरचे काळात सुधागड किल्ल्याला महत्व प्राप्त झाले. पंतसचिवांचा सरकारवाडा किल्ल्यावर बांधण्यात आला.

संस्थानचे राजे सिद्धेश्वर धोंडसे या मार्गाने किल्ल्यावर ये-जा करीत असत. या मार्गावर पूर्वीचे एकवीस गणपतीचे मंदिर असल्याने प्रत्येक भेटीचे वेळी भोर संस्थानचे राजे या गणपतीचे दर्शन घेत असत. एकवीस गणपतींना कौल लावला जाई व त्यानुसार न्यायनिवाडा होत असे. न्यायदानाचे पवित्र कार्य या गणपतींना करावे. हे एक आश्चर्यच होते! नंतरच्या काळात या मंदिराकडे दुर्लक्ष झाले व पुरातन मंदिर पूर्णपणे ढासळले गेले व प्राचीन मूर्तीही इतस्ततः विखुरल्या गेल्या.

नंतर एकवीस गणपतींची निश्चित नावे कोणती, या मूर्तीचे स्वरूप व आकार या विषयीची माहिती भार्जे येथील वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्री सहदेव ना. गोफण यांनी मुद्रल पुराण व गणेशपुराण या प्राचीन ग्रंथाचे वाचन करून शोधून काढली. गणेशकोषाच्या आधाराने त्यांनी मूर्तीचे स्वरुप निश्चित केले

आणि या गणपतींचे पुनश्च मंदिर बांधण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांना उद्युक्त केले. एकवीस गणपती परिसरातील भार्जे, सिद्धेश्वर, अडुळसे, खांडसई, वावळोली, पुई, वाकणवाडी, पायरीची वाडी, भोयराचानवघर, कासारवाडी, आबिवली पंचक्रोशीतील लोक मंदिर बांधण्यासाठी एकत्र आले. या लोकांनी पुन्हा मंदिराची बांधणी केली आहे. राजस्थाना-मधील जयपूर येथे मूर्ती बनविण्यात आल्या. १३ एप्रिल १९२० रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा करण्यात येऊन नविन एकवीस संग-मरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हे सर्व गणपती पूर्वाभिमुख आडव्या सरळ रेषेत बसविले आहेत. एकाच देवळात २१ गणपतींची पूजा करुन प्रदक्षिणा घालण्याचा वेगळा आनंद भाविकांना मिळतो. आताच्या स्थितीत मंदिराचे जीर्णोद्धारचे काम चालू असून सुसज्ज असे मंदिर उभारण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT