श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांच्या वाहन अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत असून, किरकोळ धडका ते जीवघेणे अपघात अशी चिंताजनक मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या अपघातांचा सखोल आढावा घेतल्यास बहुतांश घटनांमध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न होत आहे, ही बाब अधिक गंभीर आहे.
हरिहरेश्वर येथे होम-स्टेच्या खोलीभाड्यावरून झालेल्या वादातून पर्यटक चालकाने मालकाच्या बहिणीस चारचाकी वाहनाखाली चिरडल्याची घटना, श्रीवर्धन शहरात अल्पवयीन चालकाने थार वाहनाने दुचाकीस्वारास उडवल्याची घटना, तसेच दिवेआगर येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देत चालकाला फरफटत नेल्याने झालेला दुर्दैवी मृत्यू या तिन्ही प्रकरणांमध्ये वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. पोलीस कारवाई तात्पुरती ठरतेय?
हरिहरेश्वर दुर्घटनेनंतर काही काळ श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस विभागाकडून चेकपोस्ट उभारून पर्यटक वाहनांची तपासणी करण्यात आली होती. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईही झाली. मात्र ही मोहीम अल्पकालीन ठरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मद्यपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, तालुक्यातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित एक गंभीर बाब चर्चेत आली आहे. पर्यटकांना नियमबाह्य पद्धतीने मद्यपानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती समोर येत आहे. पर्यटन व्यावसायिक बहुतांशी शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार व्यवसाय करत असले, तरी मुंबई व पुण्यासारख्या महानगरांतील काही धनाढ्य गुंतवणूकदारांनी तालुक्यात रिसॉर्ट, होम-स्टे व रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करून प्रत्यक्ष व्यवस्थापन ‘केअर टेकर’कडे सोपवले असल्याचे वास्तव आहे. या केअर टेकरमार्फतच पर्यटकांना मद्यपुरवठा होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अल्पवयीन मद्यपान आणि कायद्याची पायमल्ली श्रीवर्धनमधील थार अपघात प्रकरणात अल्पवयीन तरुण सलग दोन दिवस संबंधित रेस्टॉरंट परिसरात मद्यपान करून अर्वाच्य शिवीगाळ व गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. ही बाब केअर टेकरच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मोटार वाहन अधिनियम, बाल न्याय कायदा, तसेच मद्यविक्रीसंबंधीचे राज्याचे नियम पाहता मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, अल्पवयीनांना मद्य उपलब्ध करून देणे, परवान्याविना मद्यपुरवठा करणे हे गंभीर गुन्हे ठरतात. पर्यटनाच्या नावाखाली तालुक्याची सुरक्षितता धोक्यात येत असेल, तर केवळ चालकांवरच नव्हे, तर मद्यपुरवठ्यास जबाबदार असणाऱ्या घटकांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अल्पवयीन मद्यपान आणि कायद्याची पायमल्ली श्रीवर्धनमधील थार अपघात प्रकरणात अल्पवयीन तरुण सलग दोन दिवस संबंधित रेस्टॉरंट परिसरात मद्यपान करून अर्वाच्य शिवीगाळ व गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. ही बाब केअर टेकरच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.