Shrivardhan Dog Bite Cases
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात 2024-2025 या केवळ एका वर्षाच्या कालावधीत 187 नागरिकांना श्वानदंशाचा त्रास सहन करावा लागला आहे. हे आकडे धक्कादायक असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
श्रीवर्धन तालुक्यात मोकाट व भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस अटोक्यातून बाहेर जात असून नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांवर, चौकांमध्ये, बाजारपेठांमध्ये टोळ्यांमध्ये फिरणार्या श्वानांनी परिसरात अक्षरशः दहशत माजवली आहे. एखादी दुचाकी किंवा चारचाकी गाडी रस्त्यावरून जात असताना त्याच्या मागे भुंकत धावणे तर सामान्य झाले आहे, पण आता हे श्वान थेट चालत्या नागरिकांवर हल्ले करण्याच्या टोकाच्या स्तरापर्यंत पोहोचले आहेत.
जीवनाबंदर परिसर, आराठी ग्रामपंचायत हद्द, तसेच शहरातील मध्यवर्ती भागांत घडलेल्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेली घटना अधिकच अस्वस्थ करणारी आहे - सहा ते आठ मोकाट श्वानांनी एकाच महिलेला खेचत नेल्याची घटना शहरात घडली होती. ही घटना केवळ क्रूरतेची नव्हे, तर प्रशासनाच्या गलथान कारभाराची जळजळीत साक्ष आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद आणि संबंधित ग्रामपंचायती भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण मोहिमा, शस्त्रक्रिया व व्यवस्थापन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसते. याअगोदर जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, कुठलीही प्राणीमित्र संस्था किंवा वेलफेअर एजन्सी पुढे न आल्याने ही प्रक्रिया अर्धवट राहिली. यामुळे या संवेदनशील प्रश्नाची जबाबदारी पुन्हा एकदा नागरिकांवर टाकली गेली आहे.
वास्तविक, हा मुद्दा केवळ नागरी असुविधा नसून लोकांच्या जीवितहानीचा गंभीर धोका बनला आहे. न्यायालयीन मार्गांचा अवलंब करूनही प्रशासनाला जबाबदारीचे भान आणावे लागेल का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. प्रशासनावर आणि जबाबदार संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जावी. नगरपरिषद व ग्रामपंचायतींनी तात्काळ मोकाट श्वानांविरोधात निर्बिजीकरण व स्थलांतर मोहिमा सुरू कराव्यात. श्वानहल्ल्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांसाठी तत्काळ वैद्यकीय मदत व नुकसान भरपाईची योजना राबवावी, अशी मागणी होत आहे.