श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरात सध्या एक भन्नाट काम सुरू आहे. सौरऊर्जेवर चालणारे डेकोरेटिव्ह स्मार्ट स्ट्रीट लाईट पोल आणि हाय मास्ट बसवण्याचा उपक्रम जोमात आहे.
तब्बल सहा मीटर उंचीचे 150 डेकोरेटिव्ह पोल आणि 12.5 मीटर उंचीचे 12 हाय मास्ट उभारायचे ठरलं. पण या चमचमत्या स्वप्नातली खरी गंमत म्हणजे कामाची पद्धत. कंत्राटदारांनी जणू वेळेवर होमवर्क न केलेल्या विद्यार्थ्यांसारखी घाईघाई केली.
रस्त्याची रुंदी, नागरिकांची सोय, वाहतुकीची अडचण - या गोष्टींचा विचार कुठे! रस्त्याच्या कडेला, कधी मधोमधच पाया उभारला. आधीच अरुंद रस्ते, आता त्यातच दिव्यांचे अडथळे काही पोल थेट बागायती झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेत. जणू निसर्गाशी एकरूप होणारे दिवे अशी संकल्पना! तर काही पोल जुन्या पथदिव्यांच्या अगदी शेजारी. लोकांना प्रश्न पडला - दोन-दोन दिवे लावून दुप्पट वीज वाचवायची आयडिया आहे का काय?
नागरिक मात्र आता थोडे गोंधळलेत. शहर उजळणार खरं, पण रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीही तशीच उजळणार. ही खांबबाजी शेवटी शोभेची ठरेल की त्रासाची? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय.दरम्यान,पर्यटकांनी मात्र याबाबत समाधान व्यक्त केले.