श्रीवर्धन शहर : श्रीवर्धन नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड सोमवारी ( 12 जानेवारी) होणार आहे.यावेळी कुणाला संधी दिली जाते याबाबत उत्सुकता लागली आहे.याशिवाय दोन स्विकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागते याकडेही शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
पालिकेची 2 डिसेंबरला निवडणूक झाली तर 21 डिसेंबरला मतमोजणी करण्यात आली.यावेळी ठाकरे शिवसेनेचे ॲड.अतुल चौगुले हे थेट नगराध्यक्षपदी निवडूण आले.तर राष्ट्रवादी (अप)चे 15,भाजपचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक विजयी झालेले आहेत.20 सदस्य संख्याअसलेल्या सभागृहात राष्ट्रवादी,भाजपकडे थेट नगराध्यक्षपद नसले 17 नगरसेवकांचे पूर्ण बहुमत आहे.
त्यामुळे कुठल्याही राजकीय चमत्काराविना उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकाची निवड अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली.सोमवारी होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार - सकाळी 10 ते 12 या वेळात उमेदवारी अर्ज भरण्यात येतील व आवश्यकतेनुसार दु. 1 वा.मतदान घेऊन निकाल जाहीर करण्यात येईल. उपाध्यक्ष पदाकरिता सत्ताधारी पक्षामध्ये 2 ते 3 नगरसेवक इच्छुक असल्याचे वृत्त आहे.अर्थात पक्षश्रेष्ठी ज्यांची निवड करतील तेच उपाध्यक्षपदी आरुढ होतील हे स्पष्ट आहे.