श्रीवर्धन (रायगड): भारत चोगले
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक २०२५ शांततेत, पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत पार पाडण्यासाठी संपूर्ण शासन यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदारांची आकडेवारी, मतदान केंद्रांची रचना, सुरक्षा बंदोबस्त, इव्हीएम उपलब्धता, कर्मचारी नियोजन पूर्ण केले गेले आहे. यंदा महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळत असून हा सहभाग उत्साहवर्धक मानला जातो.
मतदारांची आकडेवारी महिला आघाडीवर एकूण मतदार : १२,६३७, पुरुष मतदार : ६,२०२, महिला मतदार : ६,४३५, श्रीवर्धन शहरात महिलांची संख्या यंदा पुरुषांपेक्षा २३३ ने अधिक असून, महिला मतदारांचा वाढता सहभाग निवडणूक प्रक्रियेत विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सविता गर्जे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण श्रीवर्धन शहरात सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. मतदान दिवसासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर गस्त, शहरात वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक सुव्यवस्था आणि कोणत्याही अप्रीय घटना टाळण्यासाठी पोलीस पथके सक्रिय राहतील. शहरात धोकादायक किंवा अतिसंवेदनशील असे एकही केंद्र नसले तरी प्रतिबंधात्मक बंदोबस्त कायम ठेवणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचना, साहित्य वितरण, वाहतूक नियोजन, मतदार यादी तपासणी, मतदान केंद्रांची अंतिम पाहणी या सर्व टप्प्यांची पूर्तता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.
प्रत्येक कारवाईवर अधिकृत देखरेख ठेवून पारदर्शक निवडणूक सुनिश्चित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना संयम, शांतता व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
सुरक्षा आकडेवारी
१ डी वाय एस पी
१ पी आय
७ एपीआय / पीएसआय
६० पोलीस अंमलदार
३० होमगार्ड
मतदान केंद्रे - सोयीसुविधांसह सज्ज
एकूण मतदान केंद्रे : २०
अतिसंवेदनशील मतदान केंद्र: एकही नाही
प्रत्येक केंद्रावर पाणी, सावली, दिव्यांगांसाठी रॅम्प, बसण्याची व्यवस्था, स्वतंत्र प्रवेशमार्ग आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून प्रशासनाने मतदारांना सहज, सुरक्षित व स्वच्छ मतदानाचे वातावरण तयार केले आहे. इव्हीएम, मतमोजणी आणि तांत्रिक तयारी इव्हीएम मशिन्स २०, मतमोजणी टेबलं १०, मतमोजणी फेऱ्या २, मतदान कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे २५० प्रशिक्षित प्रेझायडिंग ऑफिसर्स, मतदान अधिकारी, सहाय्यक व तांत्रिक कर्मचारी सर्व नेमून देण्यात आले असून, इव्हीएम चाचणी, सीलिंग व मॉक पोल प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झाल्या आहेत. मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार असून सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली राहणार आहे.
मतदारांना शांततेत मतदान करा, कोणत्याही प्रकारे मतदान प्रक्रियेला गालबोट लागेल अशी कृती करु नये. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. कायदा-सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्धास्तपणे मतदानाचा हक्क बजावावा.सविता गर्जे, उपविभागीय पोलीस अधिकारी