Shrivardhan Coconut Plantation Farmer Latest News
श्रीवर्धन : कोकणाची ओळख म्हणजे समुद्रकिनारा, हिरव्यागार बागा आणि त्यात डोलणारी नारळाची झाडं. श्रीवर्धनचा नारळ ही या भूमीची ओळख आहे. पण आता या नारळाच्या गोडव्यालाच ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. नारळाचे उत्पादन घटले, आकार कमी झाला आणि बाजारभाव गगनाला भिडले. परिणामी शेतकरी चिंतेत तर ग्राहक हतबल झाले आहेत.
श्रीवर्धन तालुक्याची 52 किलोमीटर लांबीची सोनसळी किनारपट्टी नारळ-सुपारीच्या बागांनी सजलेली आहे. दिघी ते बागमंडळे या भागात गावोगावी नारळ व पोफळीच्या बागा दिसतात. हरिहरेश्वर, दिवेआगर, वेळास, आरावी ही गावे तर नारळामुळे प्रसिद्ध होतीच. परंतु आता या बागांची भरभराट मंदावली आहे.
आंध्र व केरळहून आणलेली रोपे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लावली गेली. या तारवटी नारळांच्या जाती गावठी नारळाशी संकरित झाल्याने मूळ नारळाचा आकार आणि गोडवा कमी झाला. 2003 च्या चक्रीवादळात जवळजवळ अर्ध्याहून अधिक झाडं उन्मळून पडली. नवीन लागवडीनंतर उत्पादन मिळायला 8-10 वर्षे लागली, त्यामुळे एक मोठी पिढी नारळाविना राहिली. अनियमित पाऊस, वाढती उष्णता आणि हवामानातील ताण यामुळे झाडांची वाढ खुंटली. नारळ उत्पादन वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन व्हावे. गावठी नारळाची जात वाचवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवावा. योग्य खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
बाजारात नारळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्पादन घटल्याने व्यापार्यांना माल मिळणे कठीण झाले आहे. शेतकर्यांना मात्र खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नफा मिळत नाही. समुद्रकिनार्याला शोभा आणणारा नारळ आज अस्तित्वाच्या संकटात सापडला आहे. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास पुढच्या पिढ्यांना श्रीवर्धनच्या गोड नारळाची चव हा फक्त इतिहास ठरेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हायब्रीड जातींमुळे आकार छोटा
श्रीवर्धनचा नारळ पातळ मलई आणि गोड पाण्यासाठी प्रसिद्ध होता. रोठा सुपारीप्रमाणे यालाही बाजारपेठेत मोठी मागणी होती. मात्र आता हायब्रीड जातींमुळे आकार छोटा व पाणी फिकटसर लागते, असा ग्राहकांचा अनुभव आहे.