रायगड, महाड : श्रीकृष्ण बाळ
350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून बक्षीस मिळालेल्या जागेत शिवाचे परमभक्त असणार्या गिरी समाजातील बुवा महाराज यांनी आपले वास्तव्य असलेल्या मठात ( आत्ताच्या सरेकर आळी महाड मधील मठ आवाडात ) शंकराचे मंदिर बांधले.
बुवा महाराज यांनी जिवत समाधी घेतल्यानंतर शिवशाही नंतरच्या काळात मंदिर पडले जाऊन त्या मंदिराचे अवशेष पिढ्यान पिढ्या टिपणीसांच्या वाड्या शेजारील मोकळ्या जागेतील गर्द झाडीमध्ये पडून होते, मठाच्या आवाडातील शिवभक्त या अवशेषांमध्ये असलेल्या पिंडींची नित्यनियमाने पूजा करीत असत. आज या ठिकाणी 3 मजली इमारत उभी असून इमारतीच्या पार्किंगमध्ये छोट्याशा शिवमंदिराची उभारणी करून त्यामध्ये शंकाराची पिंडी, बुवा महाराजांची संजीवनी समाधीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात श्रावणी सोमवारी अभिषेक व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.
महाड शहरातील सरेकर आळी मध्ये असलेले मंदिर 2011 साली महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील नागरिकांनी प्रकाश स्वामी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा व अभिषेक करून या मंदिराचे संजीवन समाधी श्री महांकालेश्वर मंदिर असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर या महांकालेश्वराच्या महतीचा अनुभव महाडमधील शिवभक्तांना येऊ लागल्याने मंदिरातील भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली.
मठ आवाडातील शिवभक्तांनी सढळ हस्ते वर्गणी देऊन महांकाळेश्वराचा मुखवटा बनवून त्याची महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराजांच्या मंदिरात कलश पूजन करून संपूर्ण बाजारपेठेतून मिरवणूक काढून मंदिरात स्थापना केली. महाड शहरातील सरेकर आळीमध्ये असलेल्या या श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्र व त्रिपुरी पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो.
दर सोमवारी महाआरती घेतली जात असून श्रावणातील प्रत्येक सोमवारी भक्तांची अलोट गर्दी दर्शन, दुग्ध अभिषेक करण्यासाठी होत असते. मंदिरात सर्व भक्तांना प्रवेश असून कोणतेही बंधन नसल्यानेे पूजा करीत असतात.
सन 2009 मध्ये ही जागा एका बिल्डरला देऊन या ठिकाणी 3 मजली इमारत बांधली गेली. त्यावेळी मठ आवाडाची पुरातन ओळख असलेल्या शिवकालीन मंदिराचा ठेवा जतन व्हावा याकरीता मठ आवाडातील शिवभक्तांनी एकत्र येऊन इमारतीच्या पार्किंगमध्ये एक शिवमंदिर बांधून देण्याची विनंती बिल्डरला केली व त्यानुसार या ठिकाणी नव्याने छोट्या शिवमंदिराची उभारणी करून त्यामध्ये शंकराची पिंडी, बुवा महाराजांची संजीवनी समाधीची स्थापना करण्यात आली. या मंदिर परिसराला मठाची आळी असे संबोधले जात असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.