पेण: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या खुशबु नामदेव ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. पूर्वी कोणताही आजार नसलेल्या विद्यार्थिनीला आरोग्य विभागाच्या कुसुम योजनेअंतर्गतच्या आरोग्य तपासणीत कुष्ठरोगी ठरविण्यात आले.
आरोग्य विभाग वा आश्रमशाळेने मुलीच्या पालकांना कळविले नाही. दरम्यान, चुकीची औषधे दिल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोडया आल्या, तिचे हातपाय सुजले आणि अत्यवस्थ होऊन तीचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक नामदेव ठाकरे यांनी केली आहे.
पेण तालुक्यातील तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीतील रहिवासी असलेल्या या विद्यार्थीनीच्या आरोग्य तपासणीत तीला कुष्ठरोग असल्याचे निदान झाल्यानंतर, त्याबाबत या मुलीच्या पालकांना कल्पना देणे आणि त्यांना सल्ला घेणे आवश्यक असताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून कोणत्याही प्रकारे त्यांना कळविण्यात आले नाही. प्राथमिक आरोग्य केंदाकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगी ठरविण्यात आलेल्या खुशबू नामदेव ठाकरे हीला कुष्ठरोग निर्मूलन उपाचाराकरिता संबंधीत गोळ्या 18 डिसेंबरपासून सुर करण्यात आल्या. तपासणी शिबीर आणि गोळ्या सुरु झाल्यानंतर 28 डिसेंबरपर्यंत या मुलीच्या वडिलांना आपल्या मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे, याबाबत कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान या मुलीची मोठी बहीण याच शाळेत शिकते आणि ती सहलीसाठी जात असल्याने तिला भेटण्यासादी नामदेव वाकरे आश्रमशाळेत आल्यावर याच शाळेत चौथीमध्ये शिकणारी आपली लहान मुलगी खुशबू आजारी असल्याने त्यांना कळले.
आश्रमशाळेतील विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यालयाने दुसऱ्याच दिवशी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक अजित पवार आणि अधीक्षिका सुवर्णा वरगने यांना करणे दाखवा नीटीस बजावली. परंतु त्या कारणे दाखवा नोटिसीला कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते. त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालयाने शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आाणि अधीक्षक यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
खुशबूला ताप येत असल्याने तिला नामदेव ठाकरे यांनी आपल्या घरी नेले. घरी नेल्यावर शाळेतून देण्यात आलेल्या गोळ्या तिचे पालक तीला देत होते. मात्र त्या कसल्या गोळ्या आहेत याची कल्पना नामदेव ठाकरे नव्हती. 3 जानेवारी रोजी वडिलांनी आपल्या मुलीला पुन्हा आश्रमशाळेत नेवून सोडले. तिच्या अंगावर पुरळ उठला तसेच हातापायांना सूज येऊ लागल्याने तीच्या वडिलांना आश्रमशाळेत बोलावून घेण्यात आले.आणि त्यावेळी नामदेव ठाकरे यांच्या सोबत खुशबुला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित होते.
पेण ग्रामीण रुग्णालयात या खुशबुची तपासणी केली असता, तीची प्रकृती गंभीर असल्याने तीला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले. तीला एमजीएम रुग्णालयात 16 जानेवारी रोजी नेण्यात आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या कोणी दिल्या असा सवाल करुन ,त्या तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. तो पर्यंत शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांच्या कडून त्या गोळ्या खुशबूला दिल्या जात होत्या. 16 जानेवारी पासून पनवेल येथील एमजीएम रुग्णलयात उपचार घेत असलेल्या खुशबुचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला.
आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता. तिच्या चेहर्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते. कुष्ठरोगाचे नव्हते. त्यामुळे शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियानात आमच्या निरोगी मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे.आमच्या मुलीच्या यकृतीत मध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज ही चुकीच्या उपचारा मुळे आली होती.आमच्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे हे मला मुख्याध्यापक किंवा अधीक्षिका यांनी सांगितले नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रमशाळा मुख्याध्यपक आणि अधीक्षिका हे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी.नामदेव ठाकरे, दुर्दैवी मृत्यू झालेल्या खुशबूचे पालक
खुशबु ठाकरे हीला शाळेत ताप आल्यावर तील रुग्णालयात दाखल करण्यास सांगीतले होते. मात्र तीच्या पालकांनी रुग्णालयात दाखल करण्यास नकार देवून तीला घरी नेले. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्यावर तीला शाळात आणले. त्यावेळी पेण उप जिल्हा रुग्णालयात तपासणीकरुन तीला पनवेल एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डायलेसीस व अन्य उपचारानंतर खुशबुची प्रकृती स्थिर झाली होती. मात्र नंतर ती शॉकमध्ये जावून तीचा मृत्यू झाला. तिचा व्हीसेरा चाचणीकरिता प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्यांच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमक कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.डॉ. प्राची नेहूलकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)
आमच्या शाळत कुष्ठरोग निर्मूलनाबाबत आरोग्य शिबीर झाले आणि त्यात खुशबु ठाकरे या विद्यार्थीनीस कुष्ठरोगी ठरवले होते.प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षिका यांच्याकडून दररोज देण्यात येत होत्या. तसेच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ प्राथमिक आरोग्य उप केंद्रात नेले.अजित पवार, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरवणे-पेण
प्राथमिक आरोग्य केंद्राने खुशबू हिला गोळ्या देण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी दररोज दोन गोळ्या झोपण्याआधी देत होते. नंतर तिला ताप आल्यावर ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर एक गोळी देण्यास सुरुवात केली.तिचे पालक शाळत आले आणि घरी घेऊन गेले. त्यावेळी त्यांना दररोज एक गोळी द्यायची आहे असे सांगितले.सुवर्णा वरगने, अधीक्षिका, शासकीय आश्रमशाळा वरवण-पेण
शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील मुलीला कुष्ठरोग झाला असून तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर मी स्वतः रुग्णालयात गेलो होतो. 22 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्यावर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.आत्माराम धाबे, प्रकल्प अधिकारी, पेण आदिवासी प्रकल्प.
शासनाच्या निर्देशनुसार आम्ही आश्रम शाळेत कॅम्प आयोजित केला होता.तेथे एक विद्यार्थिनीला कुष्ठरोग असल्याचे आढळून आले.त्या दिवशी आमच्याकडे गोळ्यांची पाकिटे नव्हती आणि त्यामुळे लगेच गोळ्या सुरू केल्या नाहीत.दुसर्या दिवशी या मुलीचे नावाचे लेबल केल्यावर 18 डिसेंबर पासून उपचार सुरू केले.डॉ. नेत्रा पाटील, वैद्यकीय अधिकारी, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र,पेण
संपूर्ण महाराष्ट्रभर कुसुम ही कुष्ठरोग रोखण्यासाठी राबवली जाणारी मोहीम असून या मोहिमेतून कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण शोधून त्यांना उपचार उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. परंतु कुष्ठरोग नसलेल्यांना उपचार करून कुसुम अभियानाला गालगोट लागल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे खुशबूच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी.जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते, कर्जत