पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे प्रभाग समिती कार्यालयात आज एक अनोखे आणि लक्ष वेधणारे आंदोलन पाहायला मिळाले. शिवशाही सेनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत कामोठे प्रभाग समितीच्या कार्यालयात जाऊन विठ्ठल नामाचा जप करत पालिकेचा निषेध व्यक्त केला. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या अनोख्या आंदोलनाची दखल घेत पालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिक नीळकंठ ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे अनोखे आंदोलन मागे घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी कामोठ्यात एक धक्कादायक घटना घडली होती. बांधकाम व्यावसायिक नीलकंठ ग्रुपने सुरू केलेल्या अनधिकृत विकासकामामुळे फुटपाथ खचला आणि मुख्य रहदारीच्या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकामाचे मोठे नुकसान झाले आहे, विशेष म्हणजे पनवेल महानगरपालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी बांधकाम व्यावसायिकाने घेतली न्हवती.
याबाबत दैनिक पुढारीने या वृत्ताला वाचा फोडली होती, तसेच पनवेल तालुक्यातील शिवशाही संघटनेने देखील आक्रमक भूमिका घेऊन, विना परवाना विकास कार्य करताना बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या सार्वजनिक बांधकामांच्या नुकसानी बाबत बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दखल करण्यात यावा अशी मागणी शिवशाही संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केली, होती त्याबाबत लेखी निवेदन देखील त्यांनी दिले होते.