रायगड

Shivrajy Abhishek Tithi 2026 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

शासकीय पातळीवर या संदर्भात आवश्यक असलेल्या सभामंडपाची कामे शेवटच्या टप्प्यात आल्याचे या संदर्भातील भेटीदरम्यान निदर्शनास आले आहे

पुढारी वृत्तसेवा

नाते : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 353 वा सोहळा उद्या शनिवारी किल्ले रायगडावर होत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमती सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मागील दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून महाड येथील कोकणकडा मित्र मंडळ तसेच अन्य शिवभक्त संघटनांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासन रायगड जिल्हा परिषद यांच्या भरीव योगदानातून तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून मंत्री भरत शेठ गोगावले किल्ले रायगडावरील विविध सुरू असलेल्या कामांसंदर्भात गंभीरपणे लक्ष देत आहेत. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी दोन दिवसापूर्वीच या संदर्भात प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली होती.

या ठिकाणी 26 व 27 जून या दोन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे. शुक्रवारी 26 जून रोजी सकाळी देवीचे पूजन त्यानंतर सकाळी दहा वाजता संभाजी महाराज जयंती, दुपारी बारा वाजता श्री जगदीश्वर व व्याधेश्वर यांचे निमंत्रित जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी शिवतुला दान व पारंपारिक गोंधळानंतर रात्र सांस्कृतिक कार्यक्रमाने ही रात्र शाहिरांची दरबारात रंगली होती. शनिवार 27 जून रोजी सकाळी सहा वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह येथे ध्वज पूजन झाल्यावर साडेसहा वाजता पालखी प्रस्थान करणार असून सात वाजता नगारखान्यासमोरील ठिकाणी भव्य ध्वजारोहण संपन्न होणार आहे. तर आठ वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते श्री शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी नऊ वाजता शाही शोभायात्रा दहा वाजता महाप्रसाद झाल्यावर संयोजकांकडून प्रतिवर्षाप्रमाणे गड स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्याप्रमाणेच महाड पोलादपूर परिसरासह रायगड जिल्ह्यातून मागील काही वर्षात येणाऱ्या शिवभक्तांची संख्या अधिक पटीने वाढेल असा विश्वास संयोजकांकडून व्यक्त होत आहे. शासकीय पातळीवर या संदर्भात आवश्यक असलेल्या सभामंडपाची कामे शेवटच्या टप्प्यात आल्याचे या संदर्भातील भेटीदरम्यान निदर्शनास आले आहे. चार दिवसापूर्वी सुरु झालेला पावसाने काल विश्रांती घेतली असली तरीही राज्याभिषेक दिवशी प्रतिवर्षाप्रमाणेच मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल असा विश्वास शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे. 353 व्या तिथीनुसार उद्या संपन्न होत असलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्णत्वास जात असल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT